मुंबई, 3 नोव्हेंबर : छत्रपती शिवाजी महाराजांचे संपूर्ण आयुष्य हे प्रेरणादायी आहे. शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांनी स्वराज्य निर्मितीसाठी गाजवलेल्या पराक्रमाचा प्रत्येक भारतीयाला अभिमान आहे. प्रत्येकाला नवी स्फुर्ती देणाऱ्या महाराजांच्या आयुष्यातील प्रसंगांवर सिनेमा काढावा असं अनेक दिग्दर्शकांच स्वप्न असतं. चित्रपट दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या नव्या मराठी सिनेमाची घोषणा केली आहे. पुढीलवर्षी दिवाळीत हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे या सिनेमात अक्षय कुमार शिवाजी महाराजांची भूमिका करणार आहे. अक्षय कुमारच का? शिवाजी महाराजांच्या भूमिकेसाठी अक्षय कुमारचीच निवड का झाली? याचे कारण चित्रपटाचे दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी उघड केलं आहे. ‘छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वांचेच आहेत. त्यांचे कार्य तळागळापर्यंत पोहचवण्यासाठी मला सशक्त चेहरा हवा होता. ज्यानं आजवर शिवाजी महाराजांची भूमिका केली नाही. त्या कलाकाराची जगभरात ओळख हवी, असं मला वाटलं. त्यामुळे शिवाजी महाराजांच्या भूमिकेसाठी अक्षयकुमार ची निवड केली असल्याचं मांजरेकर यांनी यावेळी सांगितलं. शिवाजी महाराजांवरील सिनेमाचे स्वप्न आणि संकल्पना खूप दिवसांपासून डोक्यात होती. आता हा चित्रपट तयार होत आहे. केजीएफ, कांतारा हे कन्नड सिनेमे जसे सर्वांना भावले तसाच हा मराठी सिनेमा सर्वांच्या मनात घर करेल. हा बिग बजेट सिनेमा असून यामध्ये अॅक्शन खूप महत्त्वाची असेल, असे मांजरेकर यांनी स्पष्ट केले.
वेडात मराठी वीर दौडले सात या सिनेमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या सात पराक्रमी सरदारांची गोष्ट दाखवण्यात येणार आहेत. टेलिव्हिजन आणि मराठी सिनेसृष्टीतील सात तगडे कलाकार या सिनेमात पाहायला मिळणार आहेत. बिग बॉस फेम अभिनेता विशाल निकम, जय दुधाणे, उत्कर्ष शिंदे, हार्दीक जोशी, सत्या मांजरेकर आणि प्रवीण तरडे हे कलाकार सिनेमात प्रमुख भूमिकेत आहेत. जिवाजी महाल, तुळजा, मल्हारी, सूर्याजी, चंद्राजी यासह शिवरायांच्या सात मावळ्यांची यशोगाथा सिनेमा पाहायला मिळणार आहे. Vedat Marathe Veer Daudale Sat : अक्षय कुमार महाराजांच्या भूमिकेत; कोण आहेत ते सात मावळे?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत वेडात मराठे वीर दौडले सात या सिनेमाची घोषणा करण्यात आली. सिनेमाची पहिली झलक पाहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘हा सिनेमा सुपरहिट होईल’, या शब्दात मुख्यमंत्र्यांनी या सिनेमाला शुभेच्छा दिल्या.