मुंबई, 16 डिसेंबर: केंद्राने संसदेचं हिवाळी अधिवेशन रद्द केलं आहे. त्यामुळे मोदी सरकारवर सध्या जोरदार टीका होत आहे. अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) यांनीही मोदी सरकारवर तिखट शब्दात टीका केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्राचं हिवाळी अधिवेशन रद्द करण्यात आलं आहे अशी माहिती संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली. केंद्राने हा निर्णय परस्पर घेतल्याचा आरोप होत आहे. काँग्रेसने या निर्णयाचा जोरदार विरोध केला आहे. उर्मिला मातोंडकर यांनी काय ट्विट केलं? उर्मिला यांनी ट्वीट केलं आहे, ‘राज्यात जेव्हा निवडणुका घेण्यात आल्या त्यावेळी मोठ्या सभा घेण्यात आल्या. म्हणजे संसद वगळता सर्व देश खुला आहे. खूपच लोकशाही आहे (टू मच डेमोक्रॉसी)’ असा हॅशटॅगही त्यांनी वापरला आहे.
केंद्राने काँग्रेसला पाठवलं पत्र कोरोना रुग्णांची संख्या वाढलेली आहे. थंडीचे महिने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महत्वाचे आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून केंद्राचं हिवाळी अधिवेशन रद्द करण्यात येत आहे. आता हे अधिवेशन पुढील वर्षी जानेवारी महिन्यात होणार आहे. असं पत्र केंद्र सरकारने विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसला लिहीलं आहे. एकीकडे केंद्राचं हिवाळी अधिवेशन रद्द झालेलं असतानाच दुसरीकडे मराठा आरक्षण, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशानात विरोधी पक्षानं सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरलं होतं. मराठा आरक्षणावरून विरोधकांनी सरकारवर अनेक आरोप केले. मात्र, सर्व आरोप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खोडून काढले. सभागृहाला संबोधित करताना मुख्यमंत्र्यांनी चौफेर फटकेबाजी केली.