मुंबई, 13ऑक्टोबर- प्रत्येकाला आपल्या कुटुंबासह राहण्यासाठी एक आलिशान घर (luxurious home) हवं असतं. मग ते सामान्य नागरिक असोत की सेलिब्रिटी. प्रत्येकाची इच्छा पूर्ण होतेच असं नाही. पण सेलिब्रिटींना (celebrities) अलिशान घरं घेणं तितकसं अवघड नसतं. राजकारणी, उद्योगपती, अभिनेते, अभिनेत्री यांच्या कोट्यवधी रुपयांच्या अलिशान घरांबद्दल आपण नेहमीच ऐकत, वाचत असतो. या घरांचे फोटो बघून आपले डोळे दिपून जातात. अनेक चित्रपट आणि टीव्ही स्टार्सचीही (movie and TV stars) अलिशान घरं आहेत. घर सजवण्यासाठी त्यांनी भरपूर पैसे खर्च केले आहेत. ज्याची झलक आपल्याला त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीज आणि पोस्टमधून मिळते. आज आम्ही तुम्हाला प्रसिद्ध टेलिव्हिजन स्टार्सबद्दल सांगणार ज्यांच्याकडे सुंदर घरं आहेत. याबाबतचं वृत्त डीएनएनं दिलं आहे.
टेलिव्हिजन अभिनेता अर्जुन बिजलानी (Arjun Bijlani) याने आपली बायको नेहा स्वामी हिला लग्नाच्या वाढदिवसानिमित्त थोडंसं उशिरा समुद्राच्या समोरच असलेलं घर भेट दिलं. खुद्द अर्जुनने ही बातमी एका पोस्टद्वारे इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. त्याने त्याच्या सुंदर घराची छायाचित्रं पोस्ट केली आणि आपल्या चाहत्यांसाठी लिहिलंय, ‘हक्काचं घर घेतलं. ही महत्त्वाची बातमी मला तुमच्याशी शेअर करायची होती. तुमचं प्रेम आणि पाठिंबा आपुलकीशिवाय हे शक्य झालं नसतं. धन्यवाद बाप्पा. आणि तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार.’ अर्जुन बिजलानी रिअॅलिटी शो ‘खतरों के खिलाडी 11’ चा विजेता आहे. तो टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील सर्वात लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याने ‘डान्स दिवाने’ चे अनेक सीझन होस्ट केले आहेत.
गेल्या वर्षी कोरिओग्राफर झैद दरबारशी लग्न झालेल्या गौहर खानचं (Gauhar Khan) मुंबईत सुंदर घर आहे. तिच्या घरात पांढऱ्या रंगामध्ये फर्निश केलेलं मॉडर्न फर्निचर आहे. 2016 मध्ये घर खरेदी केल्यानंतर गौहरने तिच्या मित्रांसाठी पार्टी आयोजित केली होती. त्यानंतर इन्स्टाग्रामवर पोस्ट टाकून तिनं म्हटलं होतं की, ‘शेवटी माझं आपुलकीनं घर सत्यात आलं. मित्रमैत्रिणींबरोबर काल रात्री माझ्या नव्या घरी पहिली पार्टी केली. धन्यवाद मित्रांनो. माझ्यावर प्रेम केल्याबद्दल.’
कॉमेडियन कपिल शर्माचं (Kapil Sharma) अंधेरी वेस्टमधील डीएलएच एन्क्लेव्हमध्ये एक अलिशान घर आहे. हा मुंबईतील अतिशय महागडा परिसर आहे. त्याच्या घरामध्ये एक मोठा डायनिंग हॉल असून तिथं छताला एक आकर्षक झुंबर लटकतंय. घराची विशाल बाल्कनी इथं असलेल्या faux carpet मुळं बागेसारखी वाटते. या घराची किंमत सुमारे 15 कोटी रुपये आहे.
सध्या ‘बिग बॉस 15’ चे स्पर्धक असलेला लोकप्रिय टेलिव्हिजन होस्ट आणि अभिनेता जय भानुशाली (Jay Bhanushali) याचं मुंबईच्या मध्यभागी एक अलिशान घर आहे. 39 व्या मजल्यावर असलेल्या त्याच्या सुंदर घरात क्रीम कलरचे सोफे आणि एक मोठी खिडकी आहे. त्याच्या घरात पांढऱ्या रंगाच फर्निचर खूपच कमी आहे. त्याच्या फ्लॅटमधलं किचनही सुंदर आहे. घर विकत घेण्याच्या त्याच्या निर्णयाबद्दल बोलताना जय भानुशालीने सांगितलं की, ‘मला असं वाटतं की माणूस आयुष्यात एकदाच घर खरेदी करतो त्यामुळे ते घेतानाच काय तो खर्च करायचा नंतर परत घरात बदल करण्यापेक्षा सुरवातीलाच खर्च करणं उत्तम.’
‘खतरों के खिलाडी 11’ ची स्पर्धक श्वेता तिवारीचं (Shweta Tiwari) मुंबईत एक सुंदर घर आहे. तिच्या घरात काचेची मोठी कपाटं आहेत. झाडं आणि पेंटिंग्ज आहेत. डायनिंग हॉलमध्ये एक सुंदर झुंबर आहे, इथंही वॉल आर्ट आणि फुलांनी सजावट केली आहे. श्वेताने तिच्या सर्व ट्रॉफी तिच्या लिव्हिंग रूममध्ये ठेवल्या आहेत. घराच्या सुंदर बाल्कनीमध्ये श्वेताने छोटी बाग केली आहे.