मुंबई, 21 फेब्रुवारी: टीव्ही आणि अनेक चित्रपटांतील आपल्या अॅक्टिंगमधून स्वत: चं वेगळं स्थान निर्माण करणारा म्हणजे अभिनेता गुरमीत चौधरी (Gurmeet Choudhary). त्याच्या कामामुळे चाहत्यांचा लाडका असलेल्या गुरमीतची वेगळी ओळख सांगण्याची गरज पडत नाही. गुरमीतचे लाखो फॅन्स आहेत. तो सोशल मीडियाच्या माध्यमातून (social media) त्यांच्या संपर्कात असतो आणि फोटो तसेच व्हिडिओ शेअर करत असतो. अॅक्टर होण्यापूर्वी गुरमीत चौधरीचं आयुष्य खडतर होतं. त्याला आज तो ज्या उंचीवर पोहोचला आहे तिथंपर्यंत पोहोचायला त्याला खूप संघर्ष आणि परिश्रम करावा लागला. त्यानंतर मात्र त्याने कधीही मागे वळून पाहिले नाही. गुरमीत (Gurmeet Choudhary Birthday) आता 37 वर्षांचा झाला असून 22 फेब्रुवारीला त्याचा वाढदिवस असतो. गुरमीत चौधरीही इतर स्टार्सप्रमाणे अॅक्टर (Actor) बनण्याचं स्वप्न घेऊन मुंबईत आला होता. पण, त्यांला खूप संघर्ष करावा लागला. त्याने पैशासाठी कुलाब्यातील एका दुकानात वॉचमन म्हणूनही काम केलं. एका मुलाखतीत गुरमीत चौधरीने सांगितलं होतं की, ‘मी ही गोष्ट फक्त यासाठी शेअर केली आहे, जेणेकरून मुंबईत येऊन अॅक्टर बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला प्रेरणा मिळावी.’ गुरमीत चौधरीचा जन्म लष्करी कुटुंबात (army family) झाला असून त्याला लहानपणापासूनच अॅक्टर व्हायचं होतं. मॉडेलिंग करायचा गुरमीत अॅक्टर होण्यापूर्वी गुरमीत चौधरी मॉडेलिंग (modelling) करायचा. त्याने ‘मिस्टर जबलपूर’ टायटलदेखील जिंकलं होतं. यासोबतच तो जाहिरातींमध्ये देखील काम करायचा, त्यासाठी त्याला 1500 रुपये मिळायचे. याचदरम्यान त्याला एका दुकानात वॉचमनची (watchman) नोकरीही करावी लागली. यानंतर टीव्हीवरील ‘राम’ या भूमिकेने त्याला प्रसिद्धी आणि ओळख मिळवून दिली. मात्र, रामायणानंतरही गुरमीतच्या आयुष्यातील आव्हानं कमी झाली नव्हती. लोक म्हणायचे, ‘तुला पाहण्यासाठी पैसे कोण देणार?’ एका मुलाखतीत गुरमीत म्हणाला होता, ‘सलग तीन वर्षं काम केल्यानंतर मला वाटलं की मी चित्रपटात काम करावं आणि यादरम्यान अनेकांनी मला सांगितलं की तू टीव्ही स्टार आहेस. लोक तुला टीव्हीवर फुकट पाहतात, मग पैसे देऊन स्क्रीनवर पाहायला का येतील? अशा अनेक अडचणींचा मी सामना केला आहे.’ तीन वर्षं हातात नव्हतं काम गुरमीतची 2004 मध्ये देबिनाशी भेट झाली. देबिनाने रामायणात सीतेची भूमिका साकारली होती. बराच काळ रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर दोघांनी 2011 मध्ये लग्न केलं. दोघांनीही त्यांचे संघर्षाचे दिवस एकत्र पाहिले आहेत. देबिना बॅनर्जीने एका मुलाखतीत सांगितले की, रामायणाच्या आधी जवळपास 3 वर्षे तिच्याकडे कोणतंही काम नव्हतं. रामायणपूर्वी आमच्याकडे काम नव्हतं. पैसेही नव्हते. आम्ही घरीच जेवण तयार करायचो. लोकांनी लॉकडाउनमध्ये जे केलं, ते आम्ही आधीच केलं आहे, असं ती म्हणाली होती. ‘मला वाटलं की आम्हाला एकमेकांबद्दल सर्व काही माहीत आहे. लॉकडाउनसारखे दिवस यापूर्वीही अनेकदा आमच्या आयुष्यात आले आहेत. आम्ही मुंबईत आणि या क्षेत्रात नवीन होतो तेव्हा आमच्याकडे काम नव्हतं आणि आम्ही घरीच राहायचो,’ असं देबिना त्यांच्या नात्याबद्दल म्हणाली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.