मुंबई, 25 डिसेंबर : अभिनेत्री टुनिशा शर्मा आत्महत्येप्रकरणी राम कदम यांनी मोठं विधान केलं आहे. टुनिशा शर्माच्या कुटुंबियांना न्याय मिळेल आणि जर हे लव्ह जिहादचं प्रकरण असेल तर त्याची चौकशी केली जाईल, तसंच या मागे कोणत्या संघटना आहेत हे शोधून काढलं जाईल, असं राम कदम यांनी म्हणलं आहे. षडयंत्र रचणारे कोण आहेत, याचाही तपास केला जाईल, असा इशारा राम कदम यांनी दिला आहे. टुनिशा शर्मा आत्महत्येप्रकरणी तिचा बॉयफ्रेंड शिझान खान याला 28 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार टुनिशा आणि शिझान खान यांचं 15 दिवसांपूर्वी ब्रेकअप झालं होतं, त्यामुळे टुनिशा गेल्या काही दिवसांपासून तणावात होती. ती डिप्रेशनमध्येही गेल्याचं बोललं जातंय. याच कारणामुळे एवढ्या कमी वयात प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचलेल्या टुनिशाने आत्महत्या केल्याची पोलीस सूत्रांची माहिती आहे.
प्रथमदर्शनी ही आत्महत्या दिसत असली तरी पोलीस या प्रकरणाचा प्रत्येक एँगलने तपास करत आहेत. टुनिशाच्या मृतदेहाचं मुंबईच्या जेजे रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आलं. तिच्या शरिरावर कोणत्याही जखमा आढळलेल्या नाहीत. व्हिडिओग्राफीमध्ये हे शवविच्छेदन पार पडल्याचं समजतंय. टुनिशाचा मृत्यू श्वास रोखल्यामुळे झाल्याची माहिती शवविच्छेदन अहवालातून समोर आली आहे. टुनिशाच्या आत्महत्येप्रकरणी तिच्या सहकाऱ्यांचीही पोलीस चौकशी सुरू आहे. टुनिशाने आत्महत्येचं टोकाचं पाऊल का उचललं? याची सखोल चौकशी पोलीस करत आहेत.