मुंबई, 26 सप्टेंबर : दर गुरुवारी टीआरपी रेटिंग येत असतं. त्यानुसार जनतेचा कौल कळतो. या वेळच्या टीआरपीमध्ये फारसा बदल झालेला नाहीय. आधीच्या मालिकाच याही वेळी या रेटिंगमध्ये आहेत. खरं तर नव्या मालिकांना कुठलं रेटिंग मिळालंय, याची उत्सुकता अनेकांना आहे. पण त्यांनी तशी निराशाच केलीय.
विनोदाची 'हवा' वाहतेच आहे
पाचव्या स्थानावर आहे चला हवा येऊ द्या शेलिब्रिटी पॅटर्न. दर आठवड्याला एखाद्या विनोदी शोनं कायम पहिल्या पाचात राहणं ही कौतुकास्पद गोष्ट आहे. तेच कलाकार अनेकदा तशाच भूमिकेत असतात. पण तरीही विनोदाचे षटकार, चौकार प्रेक्षकांना आवडतात. अर्थात, त्याचं श्रेय भाऊ कदम, सागर करंडे, श्रेया बुगडे या सर्व कलाकारांनाच जातं.
मिसेस मुख्यमंत्री मिरवतायत
मिसेस मुख्यमंत्रीमध्ये सुमी आणि समरचं लग्न चांगलंच गाजलं. रविवारचा 2 तासांचा भाग लग्नाचा होता. तरीही ही मालिका गेल्या वेळेप्रमाणे चौथ्या नंबरवर आहे. कमी वेळेत या मालिकेनं पहिल्या पाचात स्थान मिळवलं खरं, पण अजून काही पुढे गेलेली नाही. सुमीचा गावरानपणा प्रेक्षकांना आवडतोय.
कोंडाजींनी प्रेक्षकांना लावला चटका
तिसऱ्या नंबरवर आहे स्वराज्यरक्षक संभाजी. टीआरपीचा हा भाग चटका लावणारा होता. कोंडाजीला सिद्धीनं मारणं, त्यांचं मुंडकं शंभूराजांना भेट म्हणून पाठवणं, शंभूराजेंचं दु:ख हे सगळेच सिन हृदयस्पर्शी ठरले. कोंडाजीची भूमिका करणारा आनंद काळेनं अप्रतिम अभिनय करून इतिहास उभा केला.
नवऱ्याच्या बायकोची बॅटिंग
माझ्या नवऱ्याची बायको मालिका वाढवण्यासाठी त्यात असे काही प्रसंग टाकले जातायत त्याला काही तर्क नसतो. गुरू, शनाया, राधिका, सौमित्र यांच्या बाबतीत काही ना काही घडतच असतं. तरीही प्रेक्षक मालिकेचे भक्त आहेत. याही वेळी ही मालिका दुसऱ्या नंबरवर आहे.
प्रेक्षकांचा जीव रंगला
पुन्हा एकदा प्रेक्षकांचा जीव कशात रंगलाय, हे समोर आलंय. तुझ्यात जीव रंगला मालिका नंबर वन आहे. राणादा झिंदाबाद. राणादा, पाठकबाई, गावातले व्हिलन असं सगळं नाट्य सुरू आहे आणि प्रेक्षकांनी मालिका नंबर वन ठरवलीय.
याही वेळी पहिल्या पाचात झी मराठीच आहे. पण याच वाहिनीवरची रात्रीस खेळ चाले मालिका अजून पाचात कशी नाही याचं आश्चर्य वाटतं. या मालिकेत गावातल्या माणसांचे वेगवेगळे कंगोरे, त्यांचे एकमेकांशी असलेले संबंध, नात्यातले चढउतार चांगलेच उभे केलेत. अग्गंबाई सासुबाई एकदाच पाचवी आली होती. नंतर ती पहिल्या पाचात कधीच दिसली नाही. कलर्स मराठीवर सुरू झालेल्या स्वामिनीबद्दल अपेक्षा ठेवायला हरकत नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Trp rating