गणेशोत्सवाची धामधूम सगळीकडे सुरू आहे. अगदी वेगवेगळ्या मालिकांमध्येही. आता या वेळचं टीआरपी रेटिंग आलंय, ते गेल्या आठवड्याचं. पाहा कुणी बाजी मारलीय ते.
मिसेस मुख्यमंत्री मालिकेनं आपला पाचवा नंबर काही सोडलेला नाही. सुमी आणि समरची लगीनघाई मस्त चाललीय. लग्नानंतर सुमी आणि तिच्या सासूमध्ये चांगलीच जुगलबंदी रंगणार आहे. सध्या प्रेक्षकांना ही मालिका आवडतेय.
चला हवा येऊ द्या शोनंही आपला चौथा नंबर कायम ठेवलाय. या शोमधला शेलिब्रिटी पॅटर्न सगळ्यांना आवडतोय. मालिकांमधल्या कलाकारांची धमाल छान जमलीय. शिवाय नेहमीचे भाऊ कदम, श्रेया बुगडे, सागर करंडे, डाॅ. साबळे यांचं धूमशानही जबरदस्त असतं. सतत नवे विषय घेऊन हा शो ताजातवाना ठेवलाय.
संभाजी मालिकेत सध्या जंजिऱ्यावर अडकलेल्या कोंडाजीकडे सगळ्यांचं लक्ष आहे. संभाजी महाराजही जंजिरा सर करण्याच्या प्रयत्नात आहेत. ही मालिका तिसऱ्या स्थानावर आहे. प्रेक्षक जितके मालिकांच्या जगात रमतात, तितकेच इतिहासातही, हे पुन्हा पुन्हा सिद्ध होतंय.
पुन्हा एकदा पहिल्या पाचात फक्त झी मराठीच्या मालिकाच आहेत. खरं तर गेल्या आठवड्यात मराठी बिग बाॅसचा ग्रँड फिनाले होता. पण तरीही त्या शोला पहिल्या पाचात स्थान मिळालं नाहीच.
माझ्या नवऱ्याची बायको मालिका बरेच दिवस दुसऱ्या नंबरवरच आहे. आता गुरू आणि शनाया एकत्र आलेत. ते गुलमोहर सोसायटीत राहायला आलेत आणि राधिकाला जमेल तसा त्रास देतायत.
राणादानं आपलं पहिलं स्थान काही सोडलेलं नाही. तुझ्यात जीव रंगला नंबर वन आहे. राणादा खरा राणाच आहे हे अंजलीला कधी कळणार याची प्रेक्षक वाट पाहतायत.