दर वेळेप्रमाणे टीआरपी रेटिंग समोर आलंय. झी मराठीवर नव्या मालिका सुरू झाल्यात. कलर्स मराठीवरच्या स्वामिनी मालिकेचा प्रोमो लक्ष वेधून घेतोय. या वेळी कुठल्या मालिकेनं बाजी मारलीय ते पाहू.
पाचव्या नंबरवर 'मिसेस मुख्यमंत्री' मालिका आहे. गेल्या वेळीही हीच मालिका या नंबरवर होती. सुमी आणि समरचं आता लग्न होणार आहे. सुमी आणि समरच्या आईची जुगलबंदीही चांगलीच रंगतेय.
चला हवा येऊ द्या शोची लोकप्रियता कायम आहे. हा शो चवथ्या नंबरवर आहे. शेलिब्रिटी पॅटर्नही लोकांना आवडतो. विनोदाचं सातत्य ठेवणं हे कठीण काम. पण हवाच्या टीमला ते चांगलंच जमतंय.
टीआरपी रेटिंगमध्ये गेल्या वेळचेच नंबर्स आहेत. कुठल्याही मालिकेनं आपलं स्थान सोडलेलं नाहीय. पण अजून रात्रीस खेळ चाले, अग्गबाई सासूबाई मालिकांना टीआरपीत यश मिळालेलं नाही.
कोंडाजी, लवंगी, सिद्धी, औरंगजेब यांच्या भोवती सध्या 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिका फिरतेय. रायगडाच्या बाहेरही इतिहास चपखल उभा केलाय. ही मालिका गेल्या वेळेप्रमाणे तिसऱ्या स्थानावर आहे.
'माझ्या नवऱ्याची बायको' मालिका अजूनही दुसऱ्याच नंबरवर आहे. एकदा गेलेला पहिला नंबर या मालिकेला पुन्हा काही मिळवता आलेला नाही. सध्या मालिकेत शनाया आणि राधिका यांची टशन पाहायला मिळतेय.
पुन्हा एकदा नंबर वन ठरलीय 'तुझ्यात जीव रंगला' मालिका. राणादाची जादू कायम राहिलीय. राणादाचं लोकोपयोगी काम आणि अंजली-राणादाचा होणारा संवाद प्रेक्षकांना आवडतोय.