दर आठवड्याला येणाऱ्या टीआरपी चार्टमुळे प्रेक्षक टीव्हीवर जास्त काय पाहतात, याचा अंदाज येतो. या आठवड्यात मालिकांच्या लोकप्रियतेत बराच बदल झालाय.
हल्ली बरेच दिवस 'तुला पाहते रे' मालिका वरचं स्थान काही मिळवू शकत नाही. मालिकेत ईशा हीच गेल्या जन्मीची राजनंदिनी हे समोर आलंय. ईशाला राजनंदिनीचं आयुष्यच आठवलं. त्यामुळे विक्रांत हाच खलनायक आहे, हे ईशा आणि प्रेक्षकांनाही कळलं. त्यामुळे मालिकेबद्दलची उत्सुकता कमी झाली. राजनंदिनीचं तरुणपण मालिकेत दाखवलंय. तिची भूमिका करणारी शिल्पा तुळसकर वयानं मोठी वाटते. पुन्हा पुनर्जन्म वगैरे प्रकार प्रेक्षकांच्या फार पचनी पडलेले दिसत नाहीत. त्यामुळे ही मालिका नंबर 5वरच राहिली.
तुझ्यात जीव रंगला मालिका चौथ्या नंबरवर आहे. सध्या राणा आणि अंजली यांच्यामध्ये तणाव सुरू आहे. राणा अंजलीनं माहेरी जावं असं सांगतो. याचा राग अंजलीला आहे. बरेच दिवस या मालिकेत फारसं वेगळं काही घडत नाही.
स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेत खूपच घडामोडी घडतायत. अनाजीपंतांच्या अनेक कारवायांमुळे संभाजी राजेंवर प्राणघातक हल्ले झाले. घोड्याची नाल सैल करणं, रात्री बिछान्यावर वार करणं, विषप्रयोग असे बरेच प्रकार झाले. संभाजी महाराज सहीसलामत वाचले. इतक्या सगळ्या ऐतिहासिक घटनांनी प्रेक्षकांना धरून ठेवलं. मालिका तिसऱ्या स्थानावर आहे.
मालिकांची लोकप्रियता कमीअधिक होते. पण झी मराठीची अजून कायम आहे. पहिल्या पाचात अजून इतर वाहिन्यांवरची एकही मालिका आलेली नाही.
'चला हवा येऊ द्या शो'मध्ये आता शेलिब्रिटी पॅटर्न सुरू झालाय. मालिकेतले कलाकार येऊन काॅमेडी सादर करतात. शिवाय हा शो आता आठवड्याचे चार दिवस असतो. बिग बाॅस मराठीला स्पर्धा म्हणून चला हवा येऊ द्याचे शोज वाढवलेत. त्याचा फायदा असा झाला की हा शो नंबर 2वर पोचला.
माझ्या नवऱ्याची बायको नंबर वन काही सोडायला तयार नाही. या मालिकेत आता गुरू चांगलं वागण्याचं खोटं नाटक करतोय. खरं तर खूप काही तर्क नसलेल्या गोष्टी घडतायत. तरीही प्रेक्षक ही मालिका पाहतायत आणि ती नंबर वन ठरतेय.