मुंबई 23 मे: सुगंधा मिश्रा (Sugandha Mishra) ही छोट्या पडद्यावरील एक प्रसिद्ध विनोदी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. प्रियांका चोप्रा, आलिया भट्ट, कतरिना कैफ, कंगना रणौत यांसारख्या कित्येक अभिनेत्रींचे हुबेहुब आवाज काढून तिनं प्रेक्षकांना खळखळून हसवलं आहे. तिनं आपल्या अनोख्या मिमिक्री शैलीच्या जोरावर मनोरंजनसृष्टीत स्वत:ची अशी एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. पण तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल खरं तर तिला एक लोकप्रिय गायिका व्हायचं होतं. ती लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांची खूप मोठी फॅन आहे. परंतु तिला स्वत:चा आवाज सापडला नाही त्यामुळं तिनं इतरांच्या आवाजात स्वत:ची ओळख शोधली. (bollywood mimicry artist) आज सुगंधाचा वाढदिवस आहे. या निमित्तानं पाहूया या मिमिक्री क्वीनचा अनोखा प्रवास...
सुगंधाचा जन्म 1988 साली पंजाबमधील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला होता. लहानपणापासूनच तिला संगीताची प्रचंड आवड होती. त्यामुळं तिनं शास्त्रीय संगीत शिकलं. परंतु जेव्हा कधी ती गायची तेव्हा ती इतर कोणाची नक्कलच करतेय की काय असं समोरील व्यक्तीला वाटायचं. अखेर तिनं मग नक्कल करुनच लोकांना आश्चर्यचकित करायचं असं ठरवलं. ती विविध अभिनेत्रींच्या मिमिक्री करायची, त्यांच्या आवाजात गाणी गायची आणि मित्र-मंडळींना हसवायची.
'कठीण काळात कोणीही नव्हतं पण ती खंबीरपणे मागे उभी होती';अभिनेत्याने सांगितली आठवण...
तुझ्याकडे उत्तम संभाषण शैली आहे त्यामुळं तू संवादाच्या क्षेत्रात करिअर कर असा सल्ला तिला सभोवतालच्या मंडळींकडून मिळत होता. त्यामुळं तिनं देखील ते मनावर घेतलं अन् ती रेडियो जॉकी म्हणून काम करु लागली. या ठिकाणी काम करताना तिला आवाजाचं खरं महत्व कळलं. त्याला मॉड्युलेट कसं करायचं हे तंत्र ती शिकली. आणि व्हॉईज ओव्हरच्या क्षेत्रात आपलं नशीब आजमावून पाहू लागली. दरम्यान तिला डोरेमॉन, नेंजा हतोडी, पोकेमॉन यांसारख्या काही लोकप्रिय कार्टूनला आवाज देण्याची संधी मिळाली.
हे काम सुरुच होतं त्यानंतर तिनं आणखी एक पाऊल पुढे जात द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज या शोमध्ये भाग घेतला. या शोमध्ये ती स्टँडअप कॉमेडी करत होती. या ठिकाणी तिनं लता मंगेशकर यांची मिमिक्री केली. अन् त्यांचा हुबेहुब आवाज ऐकून प्रेक्षक देखील अवाक् झाले. अन तिथूनच सुगंधाच्या करिअरनं एक वेगळीच उंची गाठली. पुढे तिला द वॉईज, इंडियन आयडल, डान्स प्लस यांसारख्या अनेक रिअलिटी शोंमध्ये होस्टचं काम करण्याची संधी मिळाली. शिवाय हिरोपंती या चित्रपटात देखील ती झळकली. अन् आज ती आवाजाच्या क्षेत्रातील एक लोकप्रिय कलाकार म्हणून ओळखली जाते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood actress