मुंबई, 29 ऑक्टोबर- कपिल शर्माच्या लोकप्रिय ‘द कपिल शर्मा शो’मधून काही जुन्या कलाकारांनी एक्झिट घेतली, तर काही नवीन कलाकार यंदाच्या पर्वात सामील झाले आहेत. त्यापैकी एक नाव सिद्धार्थ सागरचं आहे. सिद्धार्थ मागच्या चार वर्षांपासून छोट्या पडद्यावरून गायब होता. या चार वर्षांत त्याच्या आयुष्यात बरंच काही घडून गेलंय. कॉमेडियन म्हणून काम मिळवताना सिद्धार्थला प्रंचड संघर्ष करावा लागला होता, त्यातच भर म्हणून त्याला डिप्रेशन, बायपोलर डिसऑर्डर आणि सब्स्टन्स अब्यूजचा सामना करावा लागला. पण आता तो पूर्णपणे बरा झालाय आणि त्याने कपिलच्या शोमधून पुनरागमन केलंय. मात्र एका मुलाखतीत त्याने त्याच्या संघर्षाबद्दल सांगितलं. या संदर्भात ‘आज तक’ने वृत्त दिलंय. हिंदुस्थान टाईम्सने दिलेल्या रिपोर्टमध्ये सिद्धार्थ सागर म्हणाला, ‘फक्त आपल्या इंडस्ट्रीतच नाही तर प्रत्येक इंडस्ट्री मग ती कॉर्पोरेट असो वा विद्यार्थी जीवन, प्रत्येकजण नैराश्यात आणि भीतीत जगत आहे. अनेक जण रात्री झोपण्यासाठी औषधं घेतात मीही असाच होतो, मीही असंच करायचो, पण आता नाही. (हे वाचा: Shehnaaz Gill: मुंबईपासून दूर शहनाज गिल निसर्गाच्या सानिध्यात घालवतेय वेळ; समोर आले व्हेकेशन फोटो **)** सिद्धार्थ सागर 2018 साली अचानक इंडस्ट्रीतून गायब झाला. ‘कॉमेडी सर्कस’नंतर तो स्क्रीनवर दिसलाच नाही. “मी रोज 18 प्रकारची औषधं घ्यायचो. मला बायपोलर डिसऑर्डर झाली होता. मी अडिक्टेड होतो, मला डिप्रेस्ड वाटायचं, भीती वाटायची आणि मी पॅरॉनॉइड राहायचो. सायकॉसिस प्रमाणे मला विचित्र स्वप्न पडायची. आता मी कोणत्याही प्रकारचं औषध घेत नाही. माझं मन आणि शरीर दोन्ही हेल्दी आहेत. मी एका वर्षापासून सर्व आजारांपासून मुक्त आहे. मला कोणत्याही प्रकारचं व्यसन नाही. देवाच्या कृपेने सर्व काही सुरळीत चालू आहे,” असं सिद्धार्थने सांगितलं. सिद्धार्थ पुढे म्हणाला, “एक निरोगी मेंदू नैसर्गिकरित्या सेरोटोनिन आणि डोपामाइन हॉर्मोन्स सोडतो. त्यामुळे जेव्हा तुमच्या मेंदूमध्ये केमिकल्स व्यवस्थित असतात, तेव्हा तुमचा मेंदू योग्यप्रकारे काम करतो. यामध्ये तुमचा आहारही भूमिका बजावतो. तुम्ही जे खाता तसं तुम्ही बनता. जर लोक जंक फूडचे सेवन करत असतील तर त्यांच्यात नकारात्मक ऊर्जा जास्त असते.’
‘पैसा, नाव, प्रसिद्धी आणि यश हे सर्व काही मिळते, पण या सर्व गोष्टी मिळवण्यासाठी काहीतरी गमवावं लागतं. जर तुम्ही तुमच्या शरीर आणि मेंदूकडे दुर्लक्ष केलं तर तुम्ही एका अमूल्य गोष्टीकडे दुर्लक्ष करताय. सध्या मी माझ्या शरीराला आणि मेंदूला विश्रांती देतोय. माझ्या शरीरात आणि मनात जे चाललंय ते मी सुधारण्याचा प्रयत्न करून त्याला गरज असेल तेवढ्या गोष्टी देण्याचा प्रयत्न करतो,’ असंही सिद्धार्थने सांगितलं.