सध्या झी मराठीवर एक प्रोमो चांगलाच गाजतोय. तो आहे नवी मालिका अग्गबाई सासूबाईचा. तुला पाहते रे मालिका या आठवड्यात संपतेय आणि तिच्या जागी सुरू होतेय ही नवी मालिका.
महत्त्वाचं म्हणजे एकेकाळी प्रत्येक घरात लाडकी असलेली सूनबाई तेजश्री प्रधान या मालिकेतून पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर झळकतेय.
'होणार सून मी ह्या घरची' या मालिकेतून तेजश्री सूनबाई म्हणून खूप लोकप्रिय झालेली. अनेकांच्या घरी तर अशीच सून आपल्याला हवी, अशी मागणी असायची. आता पुन्हा एकदा तेजश्री सुनेचीच भूमिका साकारतेय.
तेजश्री म्हणाली, 'एक काळ असा होता जेव्हा मी नाटक, मालिका आणि चित्रपट एकत्र करत होती. माझ्या अनेक चाहत्यांना मला पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पाहायचं होतं आणि त्यांनी तशी इच्छा देखील माझ्याकडे व्यक्त केली. चाहत्यांच्या प्रेमामुळेच मी पुन्हा एकदा टेलिव्हिजनकडे वळले असं मी म्हणेन.'
ही मालिका कौटुंबिक आणि हलकीफुलकी आहे. निवेदिता सराफ आणि गिरीश ओक पहिल्यांदाच मालिकेत एकत्र काम करतायत. इथे सूनबाईच उत्साहानं सासूबाईचं लग्न लावतेय.
निवेदितानं बऱ्याच हिंदी मालिका केल्यात तर गिरीश ओक यांची मराठी मालिकांची संख्या जास्त आहे. प्रेक्षकांची लाडकी सूनबाई पुन्हा येणार म्हणून प्रेक्षक वाट पाहतायत मालिका सुरू व्हायची.