मुंबई, 10 फेब्रुवारी : कैलाश वाघमारे हा मराठी सिनेसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेता म्हणून ओळखला जातो. ‘तान्हाजी: द अनसंग वॉरिअर’ या सुपरहिट चित्रपटात चुलत्या भूमिका साकारुन लोकप्रिय झालेला कैलाश आता एका संगीत कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. प्रसिद्ध बॉलिवूड गायिका जान्हवी श्रीमानकरसोबत त्याने एका संगीत कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. “हे जबरदस्त आहे … नवीन काहीतरी” असं म्हणत त्याने एका व्हिडीओच्या माध्यमातून या कार्यक्राची माहिती आपल्या चाहत्यांना दिली. आजवर अनेकदा आपल्या अष्टपैलू अभिनयाचं प्रदर्शन करणारा कैलाश या कार्यक्रमात मराठमोळी सुरेल गाणी गात प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहे.
मराठवाड्यातील जालना जिल्ह्यातून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात करणारा कैलाश आज एक प्रसिद्ध अभिनेता म्हणून ओळखला जातो. कैलाशनं 2015 साली मनातल्या उन्हान या मराठी चित्रपटातून आपल्या सिनेकारकिर्दीची सुरुवात केली होती. त्यानंतर त्याने हाफ टिकिट, ड्रायडे, भिकारी, भाऊ यांसारख्या चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारल्या. कैलाशला खरी लोकप्रियता मिळाली ती ‘तान्हाजी: द अनसंग वॉरिअर’ या सुपरहिट बॉलिवूड चित्रपटामुळे. या चित्रपटात त्याने चुलत्या ही भूमिका साकारली होती. या चित्रपटात त्याने केलेल्या अभिनयाची प्रचंड स्तुती करण्यात आली.