मुंबई,18 जून- छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय शोपैकी एक अशी 'तारक मेहता का उल्टा चश्मा'ची (Taarak Mehata Ka Ooltah Chshmah) ओळख आहे.हा शो गेली 14 वर्षे प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या शोमधील प्रत्येक कलाकाराला तुफान लोकप्रियता मिळाली आहे. परंतु 'दयाबेन' (Dayaben) या भूमिकेला विशेष पसंत केलं जातं. ही भूमिका अभिनेत्री दिशा वकानीने (Disha Vakani) साकारली होती. मात्र गेल्या चार वर्षांपासून ती मालिकेतून गायब आहे. चाहते दयाबेनला मालिकेत पुन्हा एकदा पाहण्यासाठी आतुर आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून दिशा मालिकेत पुनरागमन करणार अशी चर्चा सुरु होती.
परंतु दिशा वकानीच्या पुनरागमनाबद्दलच्या सर्व चर्चांना आता पूर्णविराम मिळताना दिसत आहे. कारण शोमध्ये दयाबेनचं पुनरागमन होत आहे पण दिशा नाही तर नवीन अभिनेत्री ही भूमिका साकारणार असल्याचं म्हटलं जात आहे. बऱ्याच दिवसांपासून प्रेक्षक दयाबेनला परत आणण्याची मागणी करत होते. शोचे निर्माते असित कुमार मोदी यांनी ऑडिशननंतर एका अभिनेत्रीला शॉर्टलिस्टही केल्याचं सांगितलं जात आहे.
'तारक मेहता का उल्टा चश्मा' या शोमधील प्रत्येक पात्र घराघरात लोकप्रिय आहे. पण लोक 'दयाबेन'ला प्रचंड मिस करतात. आपल्या अनोख्या संवाद शैलीने प्रेक्षकांच्या मनात घर करणाऱ्या दयाबेनला शोच्या निर्मात्यांकडून बऱ्याच दिवसांपासून वापसीची मागणी होत होती. 'टप्पू के पापा', 'हे माताजी' सारखे डायलॉग दिशा तिच्या खास आवाजात बोलताच प्रेक्षकांना खळखळून हसायला यायचं. प्रेक्षकांच्या सतत मागणीनुसार, शोचे निर्माते असित कुमार मोदी यांनी दया बेनसाठी नवीन अभिनेत्रीचा शोध सुरु केल्याचं मीडिया रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आलं होतं.
ETimes च्या रिपोर्टनुसार, 90 च्या दशकातील प्रसिद्ध टीव्ही शो 'हम पांच'मध्ये स्वीटी माथूरची भूमिका साकारणारी अभिनेत्री राखी विजान (Rakhi Vijan) दयाबेनची जागा घेऊ शकते. राखी 'तारक मेहता का' शोमध्ये दयाबेनच्या भूमिकेत दिसणार असल्याचं सांगितलं जात आहे. राखी एक उत्तम अभिनेत्री आहे आणि तिची कॉमिक टायमिंगही जबरदस्त आहे. 'राखी देख भाई देख', 'बनेगी अपनी बात' या शोमध्येसुद्धा दिसली आहे. ती टीव्हीचा प्रसिद्ध रिअॅलिटी शो 'बिग बॉस'चा भागही आहे. इतकंच नव्हे तर तिने 'गोलमाल रिटर्न्स' या बॉलिवूड चित्रपटातही काम केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.