मुंबई, 1 जुलै : सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी मुंबई पोलिसांनी मंगळवारी (30 जून )त्याचा शेवटचा सिनेमा 'दिल बेचारा'मधील अभिनेत्री संजना सांघी हिची चौकशी केली. ही चौकशी तब्बल 9 तास चालली. या चौकशीत संजनाला सिनेमाच्या शूटिंग दरम्यान सुशांतवर लावण्यात आलेल्या मी टू आरोपांबद्दल आणि त्याच सिनेमाच्या शूटिंग दरम्यान सुशांत डिप्रेशनमध्ये जाण्यासंबंधी अनेक महत्त्वाचे प्रश्न विचारण्यात आले.
अभिनेत्री संजाना सांघीनं दिलेल्या माहितीनुसार 2018 मध्ये या सिनेमासाठी तिची ऑडिशनच्या माध्यमातून निवड झाली होती. या सिनेमाचं दिग्दर्शन मुकेश छाब्रा यांनी केलं आहे. त्यांनंतर तिला समजलं की ती सुशांत सिंह राजपूतसोबत काम करणार आहे आणि सिनेमाच्या सेटवर तिची आणि सुशांतची पहिल्यांदा भेट झाली होती.
संजनानं पोलिसांनी दिलेल्या जबाबानुसार तिने सुशांतवर कोणत्याही प्रकारचे मीटू संबंधी आरोप लावले नव्हते किंवा तिच्यासोबत प्रत्यक्षात अशी कोणतीही घटना घडली नव्हती. संजना म्हणाली, '2018 मध्ये जेव्हा मी टू चळवळ सुरू होती त्यावेळी कोणीतरी अफवा पसरवली होती की सिनेमाच्या शूटिंगच्या दरम्यान सुशांतनं मला चुकीच्या पद्धतीनं स्पर्श केल्यानं मी त्याच्यावर आरोप केले आहेत. पण मी त्यावेळी भारतात नव्हते. मी माझ्या आईसोबत व्हेकेशनसाठी यु.एसला गेले होते. मला याबाबत कोणतीच माहिती नव्हती.'
संजनानं पुढे सांगितलं, 'सिनेमाचं पहिलं शेड्युल पूर्ण झालं होतं आणि दुसऱ्या शेड्युल पर्यंत माझ्याकडे बराच वेळ होता तर मी आईसोबत फिरायला गेले. मला त्यावेळी अजिबात कल्पना नव्हती की, सोशल मीडिया आणि टीव्हीवर ब्लाइंड स्पॉटच्या माध्यमातून माझ्या नावाने सुशांतवर असे आरोप केले जात आहेत. मी जेव्हा भारतात आले तेव्हा मला याबाबत समजलं. त्यावेळी मी सोशल मीडियावर याबाबत स्पष्टीकरण दिलं होतं की हे सर्व खोट्या अफवा आहेत आणि माझ्यासोबत असं काहीही घडलेलं नाही. मी सुशांत आणि मुकेश सरांना भेटले. या घटनेमुळे सुशांत डिप्रेशनमध्ये गेला होता. त्यावेळी त्यानं सांगितलं होतं की त्याला बदनाम करण्यासाठी हा कोणीतरी कट रचला आहे आणि त्यामुळे सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे.'
संजनाने सांगितलं, 'सुशांतनं त्यावेळी आमच्या दोघांच्या संभाषणाचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर शेअर केले होते आणि माझी त्याने त्याबाबत माफी सुद्धा मागितली होती. मी त्यावेळी यु.एस. ला असल्यानं त्याचा माझा काहीच संपर्क होत नव्हता आणि अशा परिस्थितीत त्याच्याकडे स्वतःवरील आरोप खोटे आहेत हे सिद्ध करण्यासाठी दुसरा कोणताही पर्याय नव्हता. त्याने आमच्या संभाषणाचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर शेअर केले होते आणि मला त्याबाबत कोणतीही समस्या नव्हती कारण त्याच्यावर झालेले आरोप हे खोटे होते. त्या केवळ अफवा होत्या आणि सुशांतकडे असं करण्यापलिकडे काहीच पर्याय नव्हता.'
संजना सांघीच्या म्हणण्यानुसार, सुशांत संपूर्ण शूटिंगच्या दरम्यान नॉर्मल होता. तो एक शांत डोक्याचा माणूस होता. त्याच्या पर्सनल लाइफ बद्दल तो कोणासोबतच बोलला नव्हता. जेव्हा कुटुंबाबाबत काही बोलणं होत असे त्यावेळी तो पटणा येथील त्याच्या कुटुंबीयांचे विनोदी किस्से आमच्या सर्वांसोबत शेअर करत असे. माझं आणि सुशांतचं बोलणं केवळ सिनेमापुरतं होत असे. ज्यात तो अनेकदा मला चांगले सल्ले देत असे आणि मोटीव्हेट करत असे.