विनोद खन्ना बॉलिवूडमधील दुसऱ्या नंबरचे सुपरस्टार होते. जेव्हा ते सुपरस्टार होते तेव्हापासून त्यांनी निर्मात्यांना त्यांच्या सिनेमात काम करायला नकार द्यायला सुरुवात केली होती.
एवढंच काय तर विनोद यांनी ज्या निर्मात्यांचे सिनेमे साइन केले होते, त्या सिनेमाचे घेतलेले पैसेही त्यांनी निर्मात्यांना परत केले होते.
विनोद खन्ना यांनी मुंबईच्या एका हॉटेलमध्ये पत्रकार परिषद बोलावली. तेव्हाचे कलाकार आतासारख्या भरमसाठ पत्रकार परिषद घ्यायचे नाहीत. त्यामुळे विनोद नक्की काय बोलणार याचीच साऱ्यांना उत्सुकता होती.
विनोद तेव्हा लाल रंगाचा कुर्ता आणि गळ्यात ओशोचा फोटो असलेली माळ घालून सर्वांच्या समोर आले. त्यांची पहिली पत्नी गीतांजली, दोन्ही मुलं अक्षय आणि राहुलही त्यांच्यासोबत होते. या पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितलं की, त्यांनी सिनेमातून संन्यास घेतला आहे.
विनोद खन्ना यांच्यावर ७० च्या दशकात रजनीश (ओशो) यांच्या विचारांचा प्रभाव पडत होता. १९७५ च्या शेवटच्या काही दिवसांमध्ये ते रजनीश आश्रमाचे संन्यासी झाले. याआधी ते तासन् तास रजनीशचे व्हिडिओ पाहायचे. त्यांच्यासोबत वेळ घालवायचे.
७० च्या दशकात ते सोमवार ते शुक्रवार सिनेमांमध्ये काम करायचे तर शनिवार- रविवार ते रजनीश यांच्या आश्रमात जायचे.
सुरुवातीला ते काही वेळ हॉटेलमध्ये राहायचे. मात्र नंतर ते आश्रमातच राहायला लागले. आश्रमात मिळेल ते काम करायचे आणि बाथरूमही साफ करायचे.
दुसऱ्या संन्यासांसारखेच ते आश्रमात राहायचे. तिकडे कोणीही स्टार नव्हतं. सगळे एकमेकांसोबत समान वागणुकीने रहायचे. त्या दोन दिवसांमध्ये ध्यान आणि अन्य कार्यक्रमांनंतर ते बागेची साफसफाई करण्यात मग्न व्हायचे.
आश्रमच्या बाहेर त्यांचा ड्रायव्हर गाडी घेऊन उभा असायचा. तेव्हा त्याला विनोद माळ्याचं काम करताना दिसायचे. आश्रमात त्यांचं नाव स्वामी विनोद भारती होतं.
शुटिंगवेळीही ते लाल रंगाच्या कुर्तीमध्येच दिसायचे. जेव्हा सिनेमाचा शॉट पूर्णपणे तयार व्हायचा तेव्हाच ते लाल रंगाचे कपडे काढायचे. त्यांना जे भेटायला यायचे त्या प्रत्येकाला विनोद एकच गोष्ट सांगायचे की, या जमिनीवर फक्त एकच देव आहे तो म्हणजे रजनीश.
मात्र या दरम्यान, सरकार रजनीश यांच्याविरोधात कार्यवाई करणार होती. तेव्हा एका रात्रीत रजनीश अमेरिकेतील ओरेगॉन येथे गेले. विनोद यांनीही त्यांच्यासोबत यावं असं त्यांचं म्हणणं होतं.
विनोद खन्ना यांनी पत्रकार परिषद घेऊन सिनेमातून संन्यास घेत असल्याचं सांगितलं आणि ते रजनीश यांच्यासोबत ओरेगॉनला गेले. त्यांनी कुटुंबापासूनही संन्यास घेत त्यांना भारतात एकटं सोडून विनोद अमेरिकेत गेले. ओरेगॉनमध्ये स्वामी विनोद भारती यांना माळीचं काम करावं लागलं.
ते पहाटे उठायचे. झाडांना पाणी घालायचे आणि बागेची देखभाल करायचे. त्या काळात विनोद यांच्याबद्दलची कोणतीही माहिती मिळणं बंद झालं होतं. जेव्हाही कोणताही भारतीय ओरेगॉन येथील रजनीशपुरममध्ये यायचा तेव्हा विनोद त्यांना, ‘मी ओशोचा माळी आहे,’ असंच सांगायचे.
रजनीशपुरममध्ये विनोद यांना एक छोटीशी रूम मिळाली होती. ६ बाय ४ फूटच्या त्या खोलीत विनोद खूश आणि समाधानी होते.