मुंबई, 28 ऑगस्ट- भाजप नेत्या आणि टिकटॉक स्टार सोनाली फोगट यांच्या मृत्यूने एकच खळबळ माजवली आहे. सुरुवातीला हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र सोनालीचा घातपात झाल्याचा दावा तिच्या कुटुंबीयांनी केला होता. त्यानंतर या प्रकरकणाला एक नवी दिशा मिळाली होती. पोलिसांनी तपास सुरु केला आहे. या प्रकरणात चार संशयितांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर काल पाचव्या संशयिताला ताब्यात घेण्यात आलं आहे.
या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या पाचव्या आरोपीने ड्रग्ससंबधी अनेक मोठे खुलासे केले आहेत. ताब्यात घेतलेल्या या व्यक्तीने सांगितलं की, तो आधी अटक केलेल्या दत्ता प्रसादला ड्रग्सचा पुरवठा करत होता. आणि त्यानेच सोनाली फोगटचा पीए सुधीर सांगवानला ड्रग्सची विक्री केली होती. या खुलास्यामुळे सोनाली प्रकरण आणखी गंभीर बनलं आहे. या प्रकरणात गोवा पोलिसांनी आत्तापर्यंत सोनालीचा पीए सुधीर सांगवान, मित्र सुखविंदर सिंह, कर्ली क्लबचा मालक, ड्रग्स तस्कर दत्ता प्रसाद आणि रामा मांडरेकर यांना ताब्यात घेतलं आहे.
दरम्यान शनिवारी सोनाली फोगटच्या कुटुंबाने हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांची भेट घेतली आहे. यावेळी सोनालीची १५ वर्षाची लेक यशोधरासुद्धा सोबत होती. यावेळी कुटुंबाने हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांकडे सीबीआय तपासाची मागणी केली आहे. यावेळी त्यांनी सोनाली मृत्यूप्रकरणात शक्य त्या मदतीचं आश्वासनही दिलं आहे. सध्या हे प्रकरण दिवसेंदिवस अधिक गंभीर बनत चाललं आहे.
(हे वाचा:Sonali Phogat Death: सोनाली फोगट प्रकरणात मोठी कारवाई; ड्रग्ज तस्कर आणि रेस्टॉरंटच्या मालकाला अटक )
सुरुवातीला सोनाली फोगटचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची बातमी समोर आली होती. परंतु त्यानंतर तिच्या भावाने हा घातपात असल्याचा दावा केला होता. तसेच तिच्या बहिणीनेही मृत्यूपूर्वी घडलेल्या काही संशयित गोष्टींचा खुलासा केला होता. त्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. आणि सोनालीचा पीए सुधीर सांगवान आणि मित्र सुखविंदर सिंहवर हत्येचा आरोप केला होता. त्यानुसार त्यांना ताब्यात घेऊन चौकशी सुरु करण्यात आली होती. आता या प्रकरणात तब्बक ५ आरोपी ताब्यात आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Actress, Entertainment