मुंबई, 31 ऑगस्ट- भाजप नेत्या आणि टिक टॉक स्टार सोनाली फोगट यांच्या मृत्यू प्रकरणात नवी अपडेट समोर आली आहे. सोनालीच्या कुटुंबियांनी ज्या कॉम्प्युटर ऑपरेटरवर सोनालीच्या ऑफिसमधील मोबाईल, लॅपटॉप, सीसीटीव्ही आणि इतर साहित्य चोरी केल्याचा आरोप केला होता. त्या कॉम्प्युटर ऑपरेटर शिवमला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. हरियाणा पोलिसांनी त्याला अटक केली आहे. सुरुवातीला सोनाली फोगटचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचं समोर आलं होतं. परंतु अभिनेत्रीच्या कुटुंबीयांनी आपल्या मुलीचा घातपात झाल्याचं सांगत चौकशीची मागणी केली होती. सोबतच त्यांनी या प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे केले होते. सोनालीच्या कुटुंबीयांनी कॉम्प्युटर ऑपरेटर असलेल्या शिवम या व्यक्तीवर फार्महाऊसमधील सोनालीचा लॅपटॉप, सीसीटीव्ही,डीव्हीआर, ऑफिसचा मोबाईल आणि इतर साहित्य चोरी केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला होता. दरम्यान आज हरियाणा पोलिसांनी कॉम्प्युटर ऑपरेटर शिवमला अटक केली आहे. त्याची चौकशी केली जात आहे. त्यामुळे सोनाली फोगटच्या मृत्यूचा आता बऱ्यापैकी उलगडा होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे. याआधी पोलिसांनी या प्रकरणात पाच जणांना अटक केली आहे. यामध्ये सोनाली फोगटचा पीए सुधीर सांगवान, मित्र सुखविंदर सिंह,ड्रग्स पेडलर, हॉटेल मालक, आणि ड्रग्स तस्कर यांचा समावेश आहे. (हे वाचा: सोनालीपूर्वी तिच्या पतीचादेखील झालाय रहस्यमय मृत्यू, एकटी झाली 15 वर्षाची लेक )
सोनालीच्या भावाने केले धक्कादायक दावे सोनालीच्या मृत्यूनंतर भावानं गोवा पोलिसात धाव घेत धक्कादायक दावे केले होते. त्यांनी सांगितलं, ‘सोनालीचा पीए सुधीर सांगवान आणि त्याचा मित्र सुखविंदर यांनी मिळून माझ्या बहिणीला जाळ्यात अडकवलं. सुखविंदरने तीन वर्षांपूर्वी सोनालीच्या जेवणात अंमली पदार्थ मिसळून तिच्यावर बलात्कार केला होता आणि त्याचा व्हिडिओही बनवला होता. त्यानंतर सुधीर आणि त्याचा मित्र सुखविंदर सातत्यानं सोनालीला ब्लॅकमेल करत होते. हे दोघं अधूनमधून सोनालीच्या जेवणात विषारी पदार्थ मिसळत होते. त्यामुळे अनेकदा तिची प्रकृती बिघडली होती. शेवटी या दोघांनी मिळून कट करत गोव्यात नेऊन तिची हत्या केली’.असा खळबळजनक दावा त्याने केला होता.