मुंबई, 18 मे : आपल्या अभिनयाने मराठी प्रेक्षकांना वेड लावणाऱ्या अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने तिच्या वाढदिवसादिवशीच चाहत्यांना गोड बातमी दिली आहे. गेले अनेक दिवस सोनाली कुलकर्णीच्या प्रेमप्रकरणाविषयी चर्चा सुरु होती. आज अखेर तिने तिच्या लाईफ पार्टनरविषयी माहिती दिली आहे. दुबईमध्ये राहणा-या कुणाल बेनोडेकर याच्याशी 2 फेब्रुवारीला सोनालीचा साखरपुडा झाला. याची अधिकृत घोषणा सोनालीने आज दिली आहे. ‘आमचा 2 फेब्रुवारी 2020 ला साखरपुडा झाला आणि आमचा हा आनंद तुम्हा सगळ्यांसोबत वाटण्यासाठी आजच्या पेक्षा योग्य दिवस असूच शकत नाही असं मला वाटतं…आपले शुभाशीर्वाद कायम पाठीशी असू द्या,’ अशी फेसबुक पोस्ट सोनालीने लिहिली आहे.
दरम्यान, सोनाली कुलकर्णी हिच्या लग्नाविषयी याआधी अनेक अफवा पसरल्या होत्या. ‘क्लासमेट्स’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सोनालीचं लग्न झालं अशा बातम्या खूप व्हायरल झाल्या होत्या. याबाबत सोनालीने नुकताच खुलासा केला होता. ती म्हणाली की सुरूवातीला चित्रपटाच्या सेटवर हा विषय गंमतीने घेतला गेला. कोल्हापूरच्या एका मोठ्या राजकीय व्यक्तीशी तिचं लग्न झाल्याच्या बातम्या वेगाने पसरत होत्या. तिने आधी दुर्लक्ष केलं पण जेव्हा तिच्या चुलत बहिणीने तिला फोन करून तिला याबाबत विचारलं तेव्हा सोनालीच्या लक्षात आलं की ही साधी अफवा नाही आहे. त्यावेळी राजकीय ओळख असणारा तिचा मित्र अभिनेता सुशांत शेलारला या प्रकरणाबाबत माहिती काढण्यास सांगितले. तेव्हा लक्षात आले की त्या राजकीय नेत्याची प्रतिमा खराब व्हावी याकरता त्याच्या विरोधकाने ही बातमी पसरवली होती. यावर सोनाली म्हणते की, ‘यात माझं नाव का गोवण्यात आले हे मात्र एक कोडं आहे’. अफवांमुळे एखाद्याला किती मनस्ताप होऊ शकतो याची प्रचिती या घटनेतून येते.