मुंबई, 28 फेब्रुवारी : बॉलिवूड अभिनेत्री श्रुती हसन नेहमीच काही ना काही कारणानं चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी ब्रेकअपमुळे सोशल मीडियावर चर्चेत आलेल्या श्रुतीनं त्यानंतर एका मुलाखतीत या ब्रेकअपमुळे ती कशी नशेच्या आहारी गेली होती आणि त्यानंतर ती यातून कशी बाहेर पडली याचा खुलासा केला. त्यानंतर आता पुन्हा एकदा श्रुतीला बॉडी शेमिंगमुळे सोशल मीडियावर ट्रोल व्हावं लागलं. मात्र श्रुतीनं तिच्यावर टीका करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे. श्रुती हसननं तिच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर करत प्लास्टिक सर्जरी बद्दल सांगितलं आहे. यासोबतच तिला तिच्या लुकवरून ट्रोल करणाऱ्यांना तिनं सडेतोड उत्तरही दिलं आहे. तिनं एक कोलाज फोटो शेअर करत लिहिलं, मला लोकांच्या विचारांनी काहीही फरक पडत नाही. पण जेव्हा लोक तुम्हाला पुन्हा पुन्हा तू जाड आहेस किंवा बारीक आहेस असं म्हणतात तेव्हा त्यांच्याकडे दुर्लक्ष करण कठिण होतं. या दोन्ही फोटोंमध्ये फक्त 3 दिवसांचा फरक आहे. मला खात्री आहे की माझ्यासारख्या महिला मला समजून घेतील. अनेकदा तुम्ही तुमच्या हार्मोन्सवर अवलंबून असता. आपल्या शरिरात बदल झालेले पाहणं सोपं नसतं पण मी माझी नाती मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे.
श्रुतीनं पुढे लिहिलं, हे माझं आयुष्य आहे आणि हो मी प्लास्टिक सर्जरी केली आहे. मला याची अजिबात लाज वाटत नाही. मी या गोष्टीला प्रमोट करत नाहीये किंवा याच्या विरोधात जात नाही आहे. मी फक्त माझं आयुष्य जगण्याचं ठरवलं आहे. आपण नेहमीच आपल्या शरीरात होणारे बदल स्वीकारायला शिकलं पाहिजे. प्रेम द्या आणि शांत राहा. मी प्रत्येक दिवशी स्वतःवर थोडं जास्त प्रेम करायला शिकत आहे. कारण ही माझ्या आयुष्यातली सर्वात सुंदर लव्ह स्टोरी आहे. या पोस्टनंतर श्रुतीला सर्व स्तरातून खूप पाठिंबा मिळत आहे. मागच्या बऱ्याच काळापासून बॉलिवूडपासून दूर असलेली श्रुती लवकरच लाबम आणि क्रॅक या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.