मुंबई, 25 नोव्हेंबर: सिद्धार्थ शुक्ला (Sidharth Shukla) आणि शहनाज गिल (Shehnaaz Gill ) यांचं बहुप्रतीक्षित ‘शोना शोना’ हे गाणं रिलीज झालं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या गाण्याची प्रतीक्षा होती. या व्हिडिओमध्ये दोघेही आपल्याला व्हायब्रण्ट कलरमध्ये आणि पॉपअप कपड्यांमध्ये दिसत आहेत. जुन्या काळ्यातल्या रोमँन्टिक प्रेमाच्या अदा या गाण्यामध्ये पाहायला मिळणार आहेत. यामध्ये ते कप आणि दोरीच्या साहाय्याने बोलताना दिसून येत आहेत. बऱ्याच दिवसांनी एक वेगळी थीम प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. तसेच शहनाजच्या प्रेमात पडल्यानंतर तो फोनबूथवर बोलत असल्याचे देखील दिसून येत आहे.
या गाण्यामध्ये आपल्याला सिद्धार्थ आणि शहनाजचा वेगळाच लूक दिसत आहे. कधी रेल्वेमध्ये तर कधी डिस्कोमध्ये रोमान्स करताना हे दोघं दिसत आहेत. 'शोना शोना' गाण्याचा गायक टोनी कक्करही गाण्याच्या व्हिडिओत झळकला आहे. सिद्धार्थ शुक्ला आणि शहनाज गिल यांचा हा दुसरा व्हिडिओ असून याआधी ‘भुला दूंगा’ हा त्यांचा पहिला व्हिडीओदेखील खूप लोकप्रिय झाला होता. ‘शोना शोना’ हे गाणं टोनी कक्कर आणि नेहा कक्कर या बहीण भावांनी गायलं असून संगीतदेखील टोनी कक्कर याने दिलं आहे. त्याचबरोबर आगम मान आणि अझीम मान यांनी डायरेक्शन केलं आहे. अंशुल गर्ग याने हा व्हिडीओची निर्मिती केली आहे. काही दिवसांपूर्वी या गाण्याच्या चित्रीकरणावेळी या दोघांनी पंजाबला भेट दिली होती. त्यावेळी एका हॉटेलबाहेर दोघेही एकत्र दिसले होते.
दरम्यान, बिग बॉसच्या घरामध्ये या दोघांची केमिस्ट्री लोकांना आवडली होती. चाहत्यांनी दोघानांही 'सिधनाज' हे नाव दिलं होतं. या शोमध्ये त्यांची मैत्रीदेखील प्रेक्षकांना आवडली होती. त्याचबरोबर सोशल मीडियावरदेखील दोघेही सक्रीय असतात. आपले फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर असतात. त्यामुळे त्यांचा चाहतावर्गदेखील मोठा आहे. त्यामुळे आता 'शोना शोना' या गाण्याला कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.