मुंबई, 3 मार्च- शाहरुख खान चा ‘मन्नत’ बंगला हा त्याच्या चाहत्यांसाठी नेहमीच आकर्षणाचं ठिकाण आहे.जगभरातील चाहते शाहरुखला भेटण्यासाठी मुंबईला येतात. आणि न चुकता शाहरुख खानच्या मन्नत बंगल्याबाहेर उभे राहून फोटो क्लिक करतात. परंतु मन्नतच्या सुरक्षेच्या बाबतीत एक धक्कादायक घटना घडली आहे. त्यामुळे शाहरुख खानच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. मन्नतच्या भिंतीवर चढून दोन तरुणांनी विना परवानगी अभिनेत्याच्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला आहे. बुधवारी रात्री दोन तरुणांनी मन्नतच्या सुरक्षेला छेद देत ‘मन्नत’च्या भिंतीवर चढून तिसरा मजला गाठला होता. मात्र, तितक्यात सुरक्षारक्षकांची नजर त्यांच्यावर पडली आणि त्यांनी दोघांना पकडले. हे दोन्ही तरुण गुजरातचे असल्याचं सांगण्यात येत आहे. या दोन्ही तरुणांना आता पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी वांद्रे पोलिस ठाण्यात विनापरवानगी आवारात प्रवेश करण्यासह भारतीय दंड संहितेच्या अन्य कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (हे वाचा: Shahrukh Khan: शाहरुख खानकडे का आहेत महिला बॉडीगार्ड्स? इतक्या वर्षानंतर उघड झालं सीक्रेट ) मीडिया रिपोर्ट्सनुसार, मन्नतच्या बहिनीतीवर चढून घरात घुसण्याचा प्रयत्न करणारे दोन्ही तरुण शाहरुख खानचे मोठे चाहते आहेत. दोघेही त्याला भेटण्यासाठी त्याच्या घरी पोहोचले होते. सुरुवातीला मन्नतच्या सुरक्षा रक्षकांनी दोघांची विचारपूस केली आणि काही वेळाने त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. मिळालेल्या माहितीनुसार, या दोघांचे वय 21 ते 25 वर्षांच्या दरम्यान आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, ज्यावेळी हे दोन तरुण ‘मन्नत’मध्ये दाखल झाले, त्यावेळी शाहरुख खान त्याच्या बंगल्यामध्ये उपस्थित नव्हता. हे दोन्ही तरुण गुजरातमधील सुरत येथील रहिवासी आहेत. पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. चौकशीत दोघांनी सांगितले की, ते शाहरुखला भेटायला गुजरातहून आले होते.
ई टाईम्सच्या वृत्तानुसार, बुधवारी रात्री ही घटना घडली, त्यावेळी शाहरुख खान ‘जवान’ची शूटिंग करत होता. तो गुरुवारी पहाटे परतला आणि लगेचच झोपायला गेला. त्यानंतर ‘मन्नत’च्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी आत लपून बसलेल्या त्या दोन्ही तरुणांना पकडले. आतापर्यंतच्या तपासात त्या दोन्ही तरुणांचा कोणताही चुकीचा हेतू समोर आलेला नाही. पोलिसांनी त्याच्या कुटुंबीयांची संपर्क साधून माहिती घेतली आहे. गुजरात पोलिसांकडे त्यांचा काही गुन्हेगारी रेकॉर्ड आहे का हे देखील तपासलं जात आहे.