मुंबई, 11 आॅक्टोबर : छोट्या पडद्यावर अव्याहतपणे चालणाऱ्या मालिका आणि त्यांचा प्रेक्षकवर्ग याचं कोडं दर आठवड्याला उलगडत जातं. दर आठवड्याला येणाऱ्या टीआरपीच्या आकड्यांमुळे कुठली मालिका जास्त पाहिली जातेय हे कळतं आणि तसे बदल मालिकांमध्ये केले जातात.
'माझ्या नवऱ्याची बायको'मधली शनाया बदलली. रसिकाला शिकायला अमेरिकेला जायचंय म्हणून तिनं मालिका सोडली आणि तिची जागा ईशा केसकरनं घेतली. अगोदर बानू म्हणून ठसलेल्या ईशाला प्रेक्षक स्वीकारणार का, असा प्रश्न पडला होता. पण टीआरपीच्या आकड्यांनी मोठा धक्काच दिलाय.
दोन आठवडे 'माझ्या नवऱ्याची बायको' नंबर वन वर आहे. उलट गेल्या आठवड्यापेक्षा या 40व्या आठवड्यात ही मालिका जास्त पाहिली गेली आहे.
नव्या शनायाचा लूक जरी बदलला असला तरी तिनं तिची बाॅडी लँग्वेज पहिल्या शनायासारखी आहे. प्रेक्षकांनीही या नव्या शनायाचा स्वीकार केलाय.
खरं तर या व्यक्तिरेखेवर अभ्यास करायला ईशाला फारसा वेळच मिळाला नाही. 29 आॅगस्टलाच निर्णय झाला आणि त्याच दिवशी शूटिंगला सुरुवात झाली. ईशाची शनाया कशी आहे? यावर ईशा सांगते, ' या शनायाचा अॅटिट्यूड बदलतोय. ती फनी, थोडीशी वेडी आहेच. पण आता ती वेगळी वागणारही आहे.'
न्यूज18लोकमतच्या वेबसाईटशी बोलताना ईशा म्हणाली होती, ' मला रसिकाच्या शनायाला धक्का लावायचा नाहीय. पण हे एक आव्हान आहे. त्यात प्रयोग करायला मला आवडेल. लोकांचं काय म्हणणं आहे, त्याप्रमाणे मी बदल करेन.'
अर्थात, या मालिकेत प्रचंड घडामोडी घडतायत. राधिका कोमात गेल्यानंतर तर मालिकेनं जास्तच वेग घेतला. राधिका शुद्धीवर येऊनही गुरू-शनायापासून ते लपवून ठेवलं गेलं. खोट्या सह्या करून गुरूनं आपण कंपनीचा मालक असल्याचं सांगत असतानाच राधिकानं एंट्री घेतली.
आता तर ही मालिका बरेच धक्के देणार आहे. गुरूच्या विरोधात राधिका आणि शनाया एकत्र येणार. अर्थात, राधिकाच ही चाल खेळतेय. तिला दोघांनाही उघडं पाडायचं आहे. त्यामुळे हा खेळ दिवसेंदिवस रंगत जाणार, हे नक्की.
या आठवड्याच्या टीआरपीमध्ये दुसऱ्या नंबरवर तुला पाहते रे, तिसऱ्या नंबरवर तुझ्यात जीव रंगला, चौथ्या नंबरवर स्वराज्यरक्षक संभाजी आणि पाचव्या नंबरवर चला हवा येऊ दे मालिका आहेत.
76 वर्षांचे अमिताभ बच्चन आजही आहेत फिट... हे आहे रहस्य
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Mazya navryachi bayako, Shanaya, TRP, टीआरपी, माझ्या नवऱ्याची बायको, शनाया