मुंबई, 23 आॅक्टोबर : गेले दोन आठवडे टीआरपी रेटिंगमध्ये ‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिका नंबर वनवर आहे. गुरू, राधिका, शनाया तिघंही रसिकांच्या मनातच जाऊन बसलेत. एवढं यश मिळत असतानाच आम्ही गुरूची भूमिका करणाऱ्या अभिजीत खांडकेकरला गाठलं. मालिकेच्या यशाबद्दल बोलताना अभिजीत म्हणाला, ’ खूप समाधान वाटतं. प्रत्येक सीन चांगला व्हावा म्हणून केलेल्या मेहनतीचं हे फळ आहे. अर्थातच हे काही कुण्या एकट्याचं श्रेय नाही. या मागे मोठी टीम असते. तुमच्या कामाचं कौतुक होणं यापेक्षा कलाकाराला अजून काय हवं?’ या मालिकेआधी अभिजीतची प्रतिमा नायकाची होती. त्याचा खलनायक आता लोकप्रिय होतोय, याची भीती नाही का वाटत त्याला? ‘भीती सुरुवातीला वाटायची. लोक कसे स्वीकारतील याची,’ अभिजीत सांगतो. ‘पण आता बघताना छान वाटतंय. एखाद्या हिरोपेक्षा जास्तच पसंती या भूमिकेला मिळतेय. त्याचा वेगळा आनंद वाटतोय. आणि काही तरी विचार करूनच मला ही भूमिका दिली असावी. कारण मी टिपिकल खलनायक वाटतच नाही. उलट हिरो दिसताना खलनायक वठवणं वेगळं आहे. ’ अभिजीत पुढे म्हणतो, ’ बऱ्याचदा खुनशी चेहऱ्याचा माणूस असा वाईट वागणार, हे गृहित असतं बऱ्याचदा. पण नाॅर्मल दिसणारा असा वागतो, तेव्हा तो धक्का असतो. हा काँट्रास पाहायला लोकांना आवडतो.’ अभिजीत म्हणतो, यामुळे उलट मी खलनायकी भूमिका करू शकतो, असा विश्वास इतर दिग्दर्शकांना वाटेल. अभिजीत बाहेर जातो तेव्हा प्रेक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया मिळतात. बरेच जण भूमिका आवडते म्हणून सांगतात. पण एकदोनदा पाठीत धपाटे बसले असल्याचं अभिजीत सांगतो. त्यानं एक गमतीशीर किस्सा सांगितला. तो म्हणाला, ‘मी एकदा माझ्या बायकोबरोबर क्लिनिकमध्ये गेलो होतो. त्यावेळी अचानक कुणी पाठीवर थाप मारली. मला अगोदर वाटलं कुणी ओळखीचं असेल म्हणून थाप मारली. पण एक अनोळखी आजी होत्या. त्या म्हणाल्या, फार राग येतो बरं का तुमचा, राधिकाला किती छळता, म्हणून सुनावलं होतं.’ एकदा तर रसिका आणि अभिजीत बाहेर असताना, एकानं रसिकाला आम्ही शनायाला कशी शिव्यांची लाखोली वाहतो, हे बोलून दाखवलं होतं. नवी शनाया आणि जुनी शनाया यातला काय फरक वाटतो अभिजीतला ? तो म्हणाला, ’ त्या दोघी कलाकार म्हणून आणि व्यक्ती म्हणूनही खूप भिन्न स्वरूपाच्या आहेत. पण जेव्हा मालिकेला प्रेक्षकांनी स्वीकारलं असतं, तेव्हा त्यातले बदलही ते स्वीकारतात. आणि रसिकाची भूमिका प्रेक्षकांना आवडत होती. म्हणून आम्ही ती भूमिका काढून न टाकता कलाकाराला रिप्लेस केलं, तरीही प्रेक्षकांचा प्रतिसाद काही कमी झाला नाही.’ अभिजीत ईशाचंही कौतुक करतो. ‘तिच्यासाठी हे अवघड होतं. इतकी लोकप्रिय भूमिका आता करायची, आणि प्रेक्षकांच्या नकारात्मक प्रतिक्रिया येतील, हे माहीत असूनही ती करायची, हे मोठं आहे.’ गुरू, शनाया आणि राधिकाकडे अभिजीत कसा पाहतो? ’ कुठलीही मालिका, सिनेमा हे समाजाचंच प्रतिबिंब असतं. आमची मालिकाही विवाहबाह्य संबंधांचं समर्थन करत नाही. पण आपण आजूबाजूला पाहतो, असं अनेकदा घडत असतं. जेव्हा एखादी वाहिनी समाजात चर्चिलेला विषय हाताळते, तेव्हा तो लोकप्रिय होतो.’ गुरुनाथ सुभेदारच्या मालिकेतल्या वागण्याचा प्रेक्षकांना खरोखर राग येतो. आणि हेच कलाकार म्हणून अभिजीत खांडकेकरचं यश आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







