TRP च्या कचाट्यात ऐतिहासिक मालिकेचा बळी! आणखी एक मराठी सीरिअल थांबवली

TRP च्या कचाट्यात ऐतिहासिक मालिकेचा बळी! आणखी एक मराठी सीरिअल थांबवली

'सावित्रीज्योती : आभाळाएवढी माणसं होती' ही मालिका आता बंद होते आहे. या मालिकेचं संशोधन सल्लागार आणि साहित्यिक हरी नरके यांनी याबाबत एक सविस्तर ब्लॉग लिहित भावना व्यक्त केल्या आहेत.

  • Share this:

मुंबई, 22 डिसेंबर : इतिहास घडवणाऱ्या क्रांतिकारी माणसांचं जगणं उलगडणारे चित्रपट (movies) आणि मालिका (serials) मराठी मनोरंजनविश्वात (Marathi entertainment world) नव्या नाहीत. मात्र अपवाद वगळता अशा मालिकांना इतर मनोरंजनप्रधान मालिकांच्या तुलनेत कमीच प्रतिसाद मिळतो. 'सावित्रीज्योती' (Savitrijoti) ही मालिकाही आता लवकरच संपणार आहे.

'सावित्रीज्योती : आभाळाएवढी माणसं होती' ही मालिका आता बंद होते आहे. या मालिकेचं संशोधन सल्लागार आणि साहित्यिक हरी नरके यांनी याबाबत एक सविस्तर ब्लॉग लिहित भावना व्यक्त केल्या आहेत.

6 जानेवारी 2020 ला ही मालिका सुरू झाली होता. अपेक्षित TRP न मिळाल्याने ही मालिका बंद होत असल्याचं कारण निर्मात्यांनी दिलं आहे. दशमी क्रिएशनने या मालिकेची निर्मिती केली असून उमेश नामजोशी हे मालिकेचे दिग्दर्शक आहेत. ओंकार गोवर्धन आणि अश्विनी कासार यांनी अनुक्रमे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या भूमिका साकारल्या होत्या.

हरी नरके यांनी म्हटलं आहे, "एरवी कोणतीही मालिका न बघणारे काही जाणते लोक ही मालिका आवर्जून बघतात. एक नवा प्रेक्षकवर्ग मालिकांकडे, सोनी मराठीकडे वळू लागलेला होता. काहीलोक वेळ जुळत नसल्याने अ‍ॅपवर ही मालिका बघत होते. पण त्यांची मोजणी टीआरपीमध्ये होत नाही. टीआरपीच्या रेसमध्ये यशस्वी आणि लोकप्रिय असलेल्या सध्याच्या इतर मराठी वाहिन्या आणि मालिकांबदल माझ्या मनात किंचितही आकस नाही. उलट कुतुहल, कौतुकच आहे. माणसाला निखळ करमणुकीची गरज असते असे मी मानतो. त्याच्या जोडीला ज्ञान, संस्कृती, वर्तमान, जगाचे व जगण्याचे भान वाढवणार्‍या, रंजनातून सामाजिक प्रबोधन, लोकशिक्षण करणार्‍या सावित्रीजोतीसारख्या मालिकाही आवश्यक आहेत."

'सदैव इतिहासात रमलेल्या मराठी माणसांचा 19-20 व्या शतकातील  समाजसुधारणा, शिक्षण आणि परिवर्तन विचार मनोरंजनतून समजून घेण्यातला रस आटलाय का?' असा प्रश्न विचारत ते पुढं लिहितात, "बहुजन समाजाला शतकांच्या गुलामीतून बाहेर काढणारे सावित्रीजोतीसारखे लोक बहुजनांनाच आपलेसे न वाटणे हे मला समाजद्रोहासारखे वाटते. हा आप्पलपोटेपणा, करंटेपणा मला फार बोचतो."

आधुनिक तंत्रज्ञानामुळे ही मालिका पुढची किमान 100 वर्षे डिजिटल स्वरूपात टिकणार आहे. आज नसली तरी उद्या, कदाचित परवा पण या मालिकेची गुणवत्ता नव्या पिढीला समजेल असा मला भरवसा वाटतो. हा आशावादही त्यांनी ब्लॉगचा शेवट करताना व्यक्त केलाय.

दरम्यान नरके यांनी यासंदर्भाने लिहिलेल्या फेसबुक पोस्टलाही मोठा प्रतिसाद मिळाला असून त्यानंतर दुसरी पोस्ट लिहत त्यांनी 'मालिकेचा दुसरा भाग काढण्याचा प्रयत्न आम्ही केला तर असेच पाठीशी उभे रहा.' असं आवाहन केलं आहे.

Published by: News18 Desk
First published: December 22, 2020, 8:03 PM IST

ताज्या बातम्या