मुंबई, 9 मार्च- हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते, निर्माता आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांचं गुरुवारी पहाटे वयाच्या 66 व्या वर्षी मुंबईत निधन झालं आहे. त्यांचे जवळचे मित्र, अभिनेते अनुपम खेर यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे.सतीश कौशिक यांच्या अचानक जाण्याने मनोरंजन सृष्टीवर शोककळा पसरली आहे. सतीश यांच्या निधनानंतर सोशल मीडियावरुन विविध क्षेत्रातील लोक शोक व्यक्त करत आहेत. दरम्यान सतीश कौशिक यांचं शेवटचं ट्विट आता व्हायरल होत आहे.
सतीश कौशिक यांचा जन्म 13 एप्रिल 1956 रोजी हरियाणातील महेंद्रगड येथे झाला होता. 1983 मध्ये आलेल्या 'मासूम' या चित्रपटातून त्यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती. जवळपास 4 दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी जवळपास 100 चित्रपटांमध्ये काम केलं आहे. 1993 मध्ये त्यांनी 'रूप की रानी चोरों का राजा' या चित्रपटाद्वारे दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवलं होतं. आत्तापर्यंत त्यांनी जवळ जवळ वीसएक दिग्दर्शित केली आहेत.
(हे वाचा:2 दिवसांपूर्वी कलाकारांसोबत होळी खेळले अन् आता अचानक निधन, प्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक हरपला )
सतीश कौशिक यांनी 'हम आपके दिल में रहते हैं, हमारा दिल आपके पास है, मुझे कुछ कहना है, बधाई हो बधाई, तेरे नाम, क्योंकि, ढोल आणि कागजसारख्या गाजलेल्या सिनेमांचं दिग्दर्शन केलं आहे. अभिनेता म्हणून त्यांनी मिस्टर इंडिया, मोहब्बत, जलवा, राम लखन, जमाई राजा, अंदाज, मिस्टर और मिसेज खिलाड़ी, साजन चले ससुराल, दिवाना मस्ताना, परदेसी बाबू, बड़े मियां छोटे मियां, हसीना मान जाएगी, राजा जी, आ अब लौट चलें, हम आपके दिल में रहते हैं, चल मेरे भाई अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
Colourful Happy Fun #Holi party at Janki Kutir Juhu by @Javedakhtarjadu @babaazmi @AzmiShabana @tanviazmi.. met the newly wed beautiful couple @alifazal9 @RichaChadha.. wishing Happy Holi to everyone 🌹🌹🌹🌺🌺🌺🌺 #friendship #festival #Holi2023 #colors pic.twitter.com/pa6MqUKdku
— satish kaushik (@satishkaushik2) March 7, 2023
सतीश कौशिक यांचं शेवटचं ट्विट-
सतीश कौशिक यांनी आपल्या शेवटच्या ट्विटमध्ये होळीच्या शुभेच्छा देत लिहलंय, 'रंगाचा, आनंदाचा सण, जावेद अख्तर यांची होळी पार्टी... भेटा या नवविवाहीत जोडप्याला अली फझल आणि रिचा चड्ढा'. त्यांचं हे ट्विट आता व्हायरल होत आहे.
सतीश कौशिक यांनी दोन दिवसांपूर्वी होळी खेळली होती. ज्येष्ठ लेखक जावेद अख्तर यांच्या घरी या पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. या पार्टीमधील काही फोटो त्यांनी आपल्या ट्विटमधून शेअर केले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.