मुंबई,4 जानेवारी- मराठमोळ्या मालिका प्रसारित स्टार प्रवाह सध्या अनेक नव्या मालिका घेऊन येत आहे. त्यातीलच एक मालिका म्हणजे ‘लग्नाची बेडी’ (Lgnachi Bedi) होय. मनोरंजनाचा हा प्रवाह आता दुपारच्या वेळेतही पाहायला मिळणार आहे. 31 जानेवारीपासून दुपारी 1 वाजता ‘लग्नाची बेडी’ ही मालिका आपल्या भेटीला येत आहे. तसेच अभिनेता संकेत पाठक (Sanket Pathak) तब्बल दोन वर्षांनंतर या मालिकेच्या निमित्ताने टेलिव्हिजनवर पुनरामगन करतोय. ‘लग्नाची बेडी’ मालेकत संकेत आयपीएस ऑफिसर राघव रत्नपारखी (Raghav Ratnparakhi) ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. देशावर मनापासून प्रेम करणारा आणि गुन्हेगारीचा खात्मा करण्यासाठी जीवाची बाजी लावायलाही मागेपुढे न पाहाणारा असा हा आयपीएस ऑफिसर राघव रत्नपारखी आपल्याला पाहायला मिळणार आहे. संकेतसाठी ही मालिका नवं आव्हान असणार आहे. लग्नाची बेडी या मालिकेतल्या व्यक्तिरेखेविषयी सांगताना संकेत म्हणाला, ‘राघव रत्नपारखी हा अतिशय प्रामाणिक आणि धाडसी आयपीएस ऑफिसर आहे. एकत्र कुटुंबात वाढलेला आणि नात्याचं महत्व जाणणारा. हे पात्र साकारण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. नव्या वर्षाची सुरुवात एका चांगल्या प्रोजेक्टने होतेय याचा आनंद आहे. खाकी वर्दीची ताकद आपल्या सर्वांनाच माहित आहे. ती परिधान केल्यानंतर अंगात एक वेगळीची ऊर्जा संचारते.
तो पुढं म्हणाला, ‘हे पात्र साकारताना एक अभिनेता म्हणून नवनव्या गोष्टी शिकायला मिळत आहेत. स्टार प्रवाह सोबत माझं जुनं नातं आहे. याआधी दुहेरी आणि छत्रीवाली या मालिकांमध्ये मी काम केलं आहे. या मालिकांवर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केलं आहे. त्यामुळे हे नवं पात्र आणि नवी मालिका प्रेक्षकांना नक्कीच आवडेल याची खात्री आहे’. असं म्हणत संकेतने आपली उत्सुकता व्यक्त केली आहे. (हे वाचा: ‘किचन कल्लाकार’मध्ये दिसणार मधुरा बाचल, निभावणार महत्त्वाची भूमिका ) 31 जानेवारीपासून आपल्या भेटीला येत असलेली ही नवी मालिका स्टार प्लसवरील एका लोकप्रिय हिंदी मालिकेचा रिमेक असणार आहे. या हिंदी मालिकेचं नाव ‘गुम है किसी के प्यार में’ असं आहे. याचाच मराठी रिमेक म्हणून लग्नाची बेडी आपल्या भेटीला येत आहे. अभिनेता संकेत पाठकसोबत या मालिकेत अभिनेत्री सायली देवधर मुख्य भूमिकेत असणार आहे. तर नकारात्मक भूमिकेत स्वामिनी फेम अभिनेत्री रेवती लेले असणार आहे.