एकीकडे या शुक्रवारी प्रदर्शित झाल्या अवेंजर्स एण्डगेम सिनेमा पाहण्यासाठी लोक जीवाचा आटापीटा करत आहेत.
तर दुसरीकडे चुलबुल पांडे म्हणजे सलमान खानने आपल्या चाहत्यांसाठी त्याच्या आगामी दबंग ३ सिनेमाची घोषणा केली.
सध्या बॉलिवूडचा हा दबंग खान आपल्या आगामी भारत सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. या सिनेमाच्या चर्चा सध्या बी- टाउनमध्ये जोरात सुरू आहेत. या सिनेमासोबतच सलमान चुलबुल पांडे होऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
शुक्रवारी सलमानने आपल्या आगामी सिनेमाच्या प्रदर्शनाच्या तारखेची घोषणा केली. या वर्षी २० डिसेंबरला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.
सलमानने आपल्या ट्विटर अकाउंटवरून एक फोटो शेअर करत ‘चुलबुल परत आलाय.’ असा मेसेज लिहिला. शेअर केलेल्या फोटोमध्ये पोलिसांच्या गणवेशात चुलबुल पांडे नावाचा बॅच लावण्यात आला आहे. या फोटोत कोणाचाही चेहरा दिसत नाही.
चुलबुल पांडे म्हणजे सलमान खानच हे आता समीकरणच झालं आहे. त्यामुळे तो सलमानचाच गणवेश असल्याचं त्याच्या चाहत्यांचं म्हणणं आहे.
जर दबंग ३ सिनेमा २० डिसेंबरला प्रदर्शित झाला तर त्याच दिवशी रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचा ब्रह्मास्त्र सिनेमाही प्रदर्शित होत आहे.
असं म्हटलं जातं की, दिग्दर्शक अयान मुखर्जीने त्याच्या आगामी सिनेमाची घोषणा दबंग ३ सिनेमाची घोषणा करण्यापूर्वीच केली होती. त्यामुळे २० डिसेंबरला बॉक्स ऑफिसवर बॉलिवूडचे हे दोन सुपरस्टार समोरा समोर उभे ठाकणार हे जवळपास निश्चित झालं आहे.