
भारत आणि बांगलादेश यांच्या सामन्यात सलामीवीर रोहित शर्मानं शतक करून विक्रमाला गवसणी घातली आहे. यंदाच्या वर्ल्ड कपमधील त्याचं चौथं शतक ठरलं आहे. वर्ल्ड कपमध्ये भारताचा सलामीवीर रोहित शर्मा केवळ एका सामन्यात अपयशी ठरला आहे.

रोहित जेव्हा मैदानात उतरतो तेव्हा चाहत्यांना देखील त्याच्याकडून मोठ्या खेळीचा अपेक्षा असते. खास त्याचा सामना पाहण्यासाठी देशभरातून लोक बर्मिंगहमला जातात. रोहितच्या चाहत्यांमध्ये एक नाव येतं ते मराठी स्टार अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचं.

सध्या सोनाली इंग्लंडमध्ये सुट्ट्यांचा आनंद लुटत आहे. यात ती आज इंडिया आणि बांग्लादेशविरूद्धचा सामना पाहायला गेली.

खास भारतातून इंग्लंडमध्ये भारताचा सामना पाहायला जावं आणि मुंबईकर रोहित शर्माने त्याच सामन्यात शतक ठोकावं, यासारखा दुग्धशर्करा योग कुठला असू शकतो. सोनालीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये तिचे अनेक फोटो शेअर केले.

याआधी भारत आणि इंग्लंडविरुद्धच्या सामन्यालाही ती गेली होती. या सामन्यादरम्यानचा फोटो इन्स्टाग्रामवर स्वतःचा भारतीय क्रिकेट जर्सीमधला फोटो शेअर करताना लिहिले की, ‘तुम्ही काही सामने जिंकता आणि काही हरता आणि तुम्ही तेव्हा नशिबवान असता जेव्हा तुम्ही याचा स्वतः अनुभव घेता.’

यानंतर सोनालीने लिहिले की, कोणत्याही नकारात्मक कमेंटने मी माझा मूड खराब करणार नाही अशी नोटही तिने लिहिली.




