फोटोंमागे होता फक्त भक्तिभाव, रितेश देशमुखने मागितली शिवप्रेमींची माफी
रितेश म्हणतो, 'आपल्या सर्वांचे दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्त्वापासून प्रेरणा घेण्यासाठी नुकताच रायगड किल्ल्यावर जाण्याचा योग आला.सर्व शिवभक्तांप्रमाणे मीही इथल्या वातावरणाने भारावून गेलो होतो.
मुंबई, 05 जुलै : रितेश देशमुखनं इन्स्टाग्रामवर रायगडावरचे वादग्रस्त फोटो टाकले आणि सगळीकडे टीकेची झोड उठली. आता यावर रितेश देशमुखनं ट्विट करू शिवप्रेमींची माफी मागितलीय.रितेश म्हणतो, 'आपल्या सर्वांचे दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्त्वापासून प्रेरणा घेण्यासाठी नुकताच रायगड किल्ल्यावर जाण्याचा योग आला.सर्व शिवभक्तांप्रमाणे मीही इथल्या वातावरणाने भारावून गेलो होतो. त्यांच्यासमोर नतमस्तक होऊन त्यांच्या पुतळ्याला हार घालून वंदन केलं. आजन्म त्यांच्या पायावर डोकं ठेवलं त्यांच्या पायापाशी कृतज्ञ होऊन बसण्याची इच्छा अनेक वर्षांपासून होती.'
'तिथे बसून आम्ही काही छायाचित्रे घेतली आणि ती सोशल मीडियाच्या माध्यमातून पोस्ट केली. यामागे फक्त भक्तिभाव होता.ती छायाचित्र घेताना किंवा तिथे बसताना आमच्या मनात कोणालाही दुखावण्याचा हेतू नव्हता.
मात्र आमच्या कृत्यामुळे कोणीही दुखावलं असेल तर त्याची आम्ही अंत:करणपूर्वक माफी मागतो.'
किल्ले रायगडावरील राज सदरेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मेघडंबरीत बसून फोटो काढणाऱ्या या उन्मत्त कलाकारांना कठोर शिक्षा करावी अशी मागणी शिवप्रेमींकडून केली जातेय. किल्ले रायगडाची सुरक्षा सध्या पुरातत्त्व विभागाकडे आहे. असं असतानाही या कलाकारांनी असं धाडस केलंच कसं असा प्रश्न विचारला जातोय.