मुंबई, 14 नोव्हेंबर: दिवाळीनिमित्त आपण नव्या कपड्यांचं शॉपिंग करतो. पण अभिनेता रितेश देशमुखने (Ritesh Deshmukh) नवीन कपडे न घेता एक भन्नाट आयडिया लढवली आहे. यंदा रितेशने आईच्या जुन्या साडीपासून सदरा शिवला आहे. स्वत:ला आणि त्याच्या दोन्ही मुलांना असेच सदरे त्याने शिवून घेतले आहेत. विशेष म्हणजे त्याचा एक क्रिएटिव्ह व्हिडीओ शेअर केला आहे. निळ्या रंगाचा सदरा आणि पांढऱ्या रंगाची सलवार यामध्ये रितेश आणि त्याची दोन्ही मुलं एकदम कडक दिसत आहेत. काय आहे रितेशच्या व्हिडीओमध्ये? अभिनेता रितेश देशमुखने व्हिडीओ शेअर करत दाखवलं आहे की, सुरुवातीला रितेश देशमुखच्या आई अर्थात वैशालीताई देशमुख यांनी त्यांची निळ्या रंगाची साडी फडकवली आहे आणि रितेश आणि त्याची मुलं सारख्याच रंगाचा कुर्ता आणि पायजमा घालून दिसत आहेत. या व्हिडीओला रितेशने कॅप्शन दिलं आहे, ‘माँ की पुरानी साडी, बच्चों लिए नए कपडें..हॅपी दिवाली.’ हा व्हिडीओ जेनेलिया डिसुजा देशमुखने शूट केला आहे. सर्वसामान्य माणसं ज्याप्रमाणे जुन्या साड्यांचे ड्रेस किंवा आणि कुर्ता शिवतात. त्याप्रमाणे रितेशनेही टाकाऊतून टिकाऊची कल्पना वापरली आहे. रितेशच्या या व्हिडीओचं अनेक नेटकऱ्यांनी कौतुक केलं आहे.
रितेश नेहमीच आपल्या सोशल मीडियावर काहीतरी हटके व्हिडीओ, पोस्ट शेअर करत असतो. नुकतंच, जेनेलिया डिसुजाने आशेची रोषणाई ही शॉर्टफिल्म आपल्या सोशल मीडियावरुन शेअर केली होती. यामध्ये रितेश आणि जेनेलिया एकत्र दिसले होते. काही दिवसांपूर्वी रितेश देशमुख विलासराव देशमुख यांचा कोट घालून एक व्हिडीओ शेअर केला होता. त्यालाही अनेकांची वाहवाह मिलाळी होती. दिवाळीनिमित्त सगळेच सेलिब्रिटी आप-आपल्या परीने सोशल मीडियावर फोटो, व्हिडीओ शेअर करत आहेत. त्यांचे चाहतेही त्यांचं भरभरुन कौतुक करत दाद देत आहेत.