मुंबई, 30 मार्च- नेटवर्क 18 कडून रायझिंग इंडिया या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. आज या कार्यक्रमाचा दुसरा दिवस आहे. या कार्यक्रमात राजकीय क्षेत्रापासून ते मनोरंजनसृष्टीतील अनेक कलाकारांनी उपस्थिती लावली होती. दरम्यान कार्यक्रमात अष्टपैलू अभिनेते मनोज वाजपेयी नीं सहभाग घेत सर्वांनाचाच उत्साह वाढवला होता. यावेळी त्यांनी आपल्या कौटुंबिक संघर्षापासून ते सिने करिअरपर्यंत अनेक गोष्टींवर मोकळेपणाने संवाद साधला आहे. मनोज वाजपेयींनी सांगितलं की, लहानपणापासून त्यांनी अतिशय हलाखीचे दिवस पाहिले आहेत. त्यांना 6 भावंडे होती. यामध्ये सर्वात मोठे मनोज होते. त्यांनी म्हटलं की, वडीलांनंतर मोठा भाऊ हा वडिलांची जागा घेतो आणि त्यांच्या जबाबदाऱ्या सांभाळतो. तो मोठा भाऊ जरी 12 वर्षांचा असला तरी तो या परिस्थिती मोठाच होतो. वय लहान असूनही अशावेळी जबाबदाऱ्यांची जाणीव व्हायला लागते. त्यामुळे मनोज यांनी सुरुवातीपासूनच गरिबी पाहिली आणि अनुभवली आहे. या काळात राग हा आपला सर्वात मजबूत आधार असल्याचं त्यांनी म्हटलं. (हे वाचा: Mrunal Thakur : 10 वर्षे TVवर काम केलं पण…; मृणाल ठाकूरनं सांगितली मन की बात ) अलीकडच्या काही वर्षांमध्ये आपला राग बराच कमी झाला असल्याचं मनोज यांनी सांगितलं. तसेच त्यांनी सांगितलं की, दिल्लीहून मुंबईला आपण खलनायक बनण्यासाठी अजिबात आलो नव्हतो. आपल्यालासुद्धा चित्रपटांमध्ये एखादी आदरपूर्वक चांगली भूमिका मिळावी अशी माझी अपेक्षा होती. मी 10 वर्षे दिल्लीत थियेटर केलं आहे. पण जेव्हा मुंबईमध्ये येऊन आपण कामासाठी निर्माते किंवा दिग्दर्शकांच्या कार्यालयांच्या बाहेर उभं राहतो, तेव्हा तुम्ही याआधी काय केलं आहे? किंवा काय करत आहे हे अजिबात विचारलं जात नाही. तुम्हाला तिथे व्यक्त व्हायची संधी अजिबात नसते असंही मनोज यांनी यावेळी बोलताना सांगितलं.
दरम्यान अभिनेत्याने करिअरच्या सुरुवातीला आपल्यासोबत घडलेला एक किस्सासुद्धा शेअर केला आहे. एके दिवशी शूटिंग संपल्यानंतर त्यांनी एका आलिशान हॉटेलच्या डिस्कोमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. यावेळी शाहरुख खान आणि आणखी एक कलाकार त्यांच्यासोबत होता. हॉटेलच्या दारात त्यांना थांबवण्यात आलं. आणि सांगितलं की, ही व्यक्ती आतमध्ये जाऊ शकत नाही. कारण त्यांनी बूट घातलेले नाहीत. शाहरुख आणि आणखी एक मित्र यावेळी संपूर्ण हॉटेलमध्ये कोणी बूट उधारीवर देतो का हे शोधत होते. दरम्यान हॉटेलच्याच एका कर्मचाऱ्याने त्यांना बूट दिले आणि नंतर परत करायला सांगितलं. अशाप्रकारे त्यांना त्या हॉटेलमध्ये एन्ट्री मिळाली होती.
मनोज वाजपेयी यांना बॉलिवूडमधील एक दमदार अभिनेता म्हणून ओळखलं जातं. त्यांनी खलनायकापासून मुख्य अभिनेत्यापर्यंत आणि गंभीर पासून विनोदीपर्यंत अनेक प्रकारच्या भूमिका साकारात आपला ठसा उमठवला आहे. त्यांनी ‘सत्या’, ‘शूल’, ‘गँग्स ऑफ वासेपूर’ अशा अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केलं आहे.