मुंबई, 11 नोव्हेंबर : अभिनेता रणवीर सिंह मागच्या काही काळापासून त्याचा आगामी ‘83’मुळे खूप चर्चेत आहे. काही काळापूर्वीच त्याचा या सिनेमातील फर्स्ट लुक रिलीज झाला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्याचा कपिल देव यांच्या व्यक्तिरेखेतील एक फोटो समोर आला आहे. जो पाहिल्यावर कपिल देव आणि रणवीर यांच्यातील फरक ओळखणंही प्रेक्षकांना कठीण जाऊ शकतं. रणवीरचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. रणवीर सिंहने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर नुकताच ‘83’ सिनेमातील एक फोटो शेअर केला आहे. ज्यात तो हुबेहूब भारताचे माजी क्रिकेट कर्णधार कपिल देव यांच्यासारखा दिसत आहे. या फोटोला रणवीरनं ‘नटराज शॉट’ असं कॅप्शन दिलं आहे. कपिल देव यांच्या काळात त्यांचा हा नटराज शॉट खूप लोकप्रिय होता. नटराज शॉट ही कपिल देव यांची ओळख होती. पण रणवीरनं त्यांच्या या शॉटची हुबेहूब केलेली कॉपी आणि मेकअप यामुळे रणवीर आणि कपिल देव यांच्यातील फरक ओळखणं प्रेक्षकांना अवघड जाऊ शकतं.
83 या सिनेमाबद्दल रणवीरच्या चाहत्यांना कमालीच्या अपेक्षा आहेत. भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांच्या भूमिकेत स्वतःला उतरण्यासाठी रणवीरने जिवाचं रान केलं असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. या भूमिकेसाठी त्याने खास फिटनेस कन्सल्टन्ट राजीव मेहराकडून विशेष प्रशिक्षण घेतलं. असं होतं रणवीरचं रुटीन- - सकाळी 20 मिनिटं फुटबॉल खेळून रणवीर वॉर्मअप करायचा. त्यानंतर स्ट्रेचिंग करायचा. - रणवीर जवळपास 12 ते 13 षटकांची गोलंदाजी करायचा. त्यानंतर फलंदाजीही करायचा. यादरम्यान तो जवळपास 200 चेंडू खेळायचा. - ब्रेक घेऊन तो फलंदाजी आणि गोलंदाजीचे स्वतःचे व्हिडीओ पाहायचा आणि त्यातून नोट काढायचा. - दररोज कमीत कमी चार तास तरी तो व्यायाम करायचा. - 40 मिनिटं स्विमिंगला द्यायचा यामुळे त्याच्या अतिरिक्त कॅलरीज कमी व्हायच्या.
‘83’ची कथा खूपच प्रेरणादायी आहे. त्यावेळी भारताचा संघ असा संघ होता ज्यांना कोणाही गांभीर्यानं घेतलं नव्हतं. या संघाकडून कोणालाही काही खास अपेक्षा नव्हत्या. पण भारतीय संघानं 1983 मध्ये विश्वचषक जिंकून भारतीय क्रिकेटमधील ऐतिहासिक कामगिरी केली. भारताच्या या विजयामुळे भारतातील क्रिकेटचा चेहरा बदलला आणि भारतानं क्रिकेट विश्वात सर्वांना आपली दखल घ्यायला लावली. रणवीर सिंहची प्रमुख भूमिका असलेल्या ‘83’ या बायोपिकचं दिग्दर्शन कबीर खान करत आहे. या सिनेमात रणवीर व्यतिरिक्त हार्डी संधू, साकिब सलीम, पंकज त्रिपाठी, चिराग पाटील, आदिनाथ कोठारे, ताहिर भासिन, एमी विर्क आणि साहिल खट्टर अशी तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. हा सिनेमा 10 एप्रिल 2020ला प्रदर्शित होणार आहे. ============================================================ नदीशेजारी उलटला रसायनानं भरलेला टँकर; पाण्यावर पांढऱ्या फेसाची चादर, पाहा VIDEO