मुंबई, 25 ऑगस्ट- प्रसिद्ध कॉमेडियन-अभिनेता राजू श्रीवास्तव गेल्या 15 दिवसांपासून रुग्णालयात दाखल आहेत. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. देशातील सर्वोत्तम डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत आहेत. दररोज राजू यांच्याबाबत अनेक हेल्थ अपडेट्स समोर येत आहेत. सोबतच त्यांच्या मृत्यूच्या अफवादेखील पसरल्या होत्या. त्यामुळे त्यांचे चाहते चिंतेत होते. परंतु आता सर्वांसाठी एक दिलासादायक बातमी आहे.
एएनआयच्या रिपोर्टनुसार, तब्बल 15 दिवसांनंतर राजू श्रीवास्तव यांना शुद्ध आली आहे. गेल्या 15दिवसांपासून ते कोमात होते. परंतु लेटेस्ट रिपोर्टनुसार, त्यांच्या प्रकृतीत सकारत्मक सुधारणा दिसून येत असून त्यांना शुद्ध आल्याचं सांगितलं जात आहे. त्यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
जिममध्ये वर्कआउट करताना राजू यांच्या छातीत दुखू लागलं होतं. त्यांनतर ते ट्रेडमिलवरुन खाली कोसळले होते. त्यांना तात्काळ एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांनतर त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. उपचारांना योग्य तो प्रतिसाद मिळत नसल्याने डॉक्टर चिंतेत होते.
सर्वप्रथम डॉ.अनन्या गुप्ता यांनी सांगितलं होतं की, राजू श्रीवास्तव यांची बीपी नियंत्रणात येत नाहीय. सामान्यतः अँजिओप्लास्टी केल्यानंतर रुग्णाची प्रकृती पूर्वपदावर येते आणि त्याला सामान्य वॉर्डात हलवलं जातं. राजू श्रीवास्तव यांच्यावर अँजिओप्लास्टी केल्यानंतरही त्यांची बीपी 80/56 इतकी कायम होती. दरम्यान कॉमेडियनच्या निधनाच्या अफवादेखील पसरल्या होत्या. त्यांच्या कुटुंबाने या निव्वळ अफवा असल्याचं सांगत त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचं म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Comedian, Entertainment