मुंबई, 11 एप्रिल : लेखक, अभिनेता आणि दिग्दर्शक अनंत महादेवन (Anant Mahadevan) 'सिंधुताई सकपाळ' यांच्या बायोपिकमुळे चर्चेत आले होते. 'मी सिंधुताई सकपाळ' या चित्रपटात एका निराधार स्त्रीनं हजारो अनाथ मुलांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी कशाप्रकारे प्रयत्न केले, हे दाखवण्यात आलं होतं. ज्येष्ठ समाजसेविका दिवंगत सिंधुताई सपकाळ यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट होता. अनंत महादेवन यांनी बनवलेल्या 'गौरहरी दास्तान' या चित्रपटात एका स्वातंत्र्यसैनिकाचा सरकारविरुद्ध 32 वर्षे चाललेला लढा दाखवला आहे. या चित्रपटांव्यतिरिक्त महादेवन यांनी भारतातील पहिल्या प्रॅक्टिसिंग महिला डॉक्टर रखमाबाई यांचा बायोपिक ‘डॉक्टर रखमाबाई’, ‘माईघाट’ आणि ‘बिटर स्वीट’सारखे चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. त्यांनी सामाजिकदृष्ट्या अतिशय संवेदनशील (Socially Sensitive) आणि वेगळ्या कथा मनोरंजक पद्धतीनं प्रेक्षकांसमोर मांडल्या आहेत. आता अनंत महादेवन पुन्हा एकदा अशीच एक सामाजिक कथा लोकांसमोर मांडण्यास सज्ज झाले आहेत. थोर समाजसुधारक (Social Reformer) दाम्पत्य महात्मा ज्योतीराव फुले (Jyotirao Phule) आणि सावित्रीबाई फुले (Savitribai Phule) यांचा संघर्ष मोठ्या पडद्यावर दाखवण्यास महादेवन सज्ज झाले आहेत. अमर उजालानं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
अशिक्षित लोकांच्या जीवनात उल्लेखनीय बदल घडवून आणण्यासाठी काम करणाऱ्या फुले दाम्पत्याच्या आयुष्यावर एक बायोपिक तयार केला जाणार आहे. महात्मा ज्योतीराव फुले यांच्या 195 व्या जयंतीनिमित्त आज (11 एप्रिल) 'फुले' (Phule) चित्रपटाच्या फर्स्ट लुकचं (First Look) अनावरण करण्यात आलं. राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक अनंत महादेवन हे 'फुले' या हिंदी चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन करणार आहेत. या चित्रपटात प्रतीक गांधी (Pratik Gandhi) आणि पत्रलेखासारखे (Patralekha) प्रख्यात कलाकार जोतीराव आणि सावित्रीबाईंच्या भूमिकेत दिसणार आहेत. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी देशात सामाजिक बदल घडवून आणण्यात आणि महिलांना शिक्षण (Women Education) देण्यात मोलाची भूमिका बजावली आहे. हे एक असं महान दाम्पत्य आहे, ज्यांचं योगदान देश कधीही विसरू शकणार नाही. फुले दाम्पत्यानं संयुक्तपणे दीर्घकाळ अस्पृश्यता आणि जातीय भेदभावाच्या विरोधात कार्य केलं. त्यांनी सत्यशोधक समाजाची (Satyashodhak Samaj) स्थापना करून मागास जातीतील लोकांच्या समान हक्कासाठी लढा दिला. महिलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचं काम या जोडीनं केलेलं आहे.
चित्रपटाचा फर्स्ट लुक रिलीज होताच लोकांची उत्सुकता वाढली आहे. पोस्टरमध्ये (Poster) प्रतीक आणि पत्रलेखा हुबेहूब जोतीरावांसारखा आणि सावित्रीबाई यांच्यासारखे दिसत आहेत. सावित्रीबाईंची भूमिका करण्याची संधी मिळाल्यामुळे अभिनेत्री पत्रलेखा खूप आनंदी आहे. 'माझं बालपण मेघालयातील शिलाँगमध्ये गेलं आहे. हे एक असं राज्य आहे जिथे पुरुषांपेक्षा महिलांच्या अधिकार आणि निर्णयांना अधिक महत्त्व दिलं जातं. त्यामुळे स्त्री-पुरुष समानता (Gender Equality) हा विषयाला माझ्या वैयक्तिक आयुष्यात फार महत्त्वाचं स्थान आहे. सावित्रीबाई फुले यांनी पती जोतीरावांसोबत 1848 मध्ये घरात मुलींसाठी शाळा सुरू केली. महात्मा फुले यांनी विधवांचे पुनर्विवाह करण्यासाठी आणि गर्भपातावर नियंत्रण ठेवण्यासाठी अनाथाश्रमाची स्थापना केली. या गोष्टींमुळे हा चित्रपट माझ्यासाठी खूप खास आहे,' असं पत्रलेखा म्हणाली.
अभिनेता प्रतीक गांधीदेखील जोतीराव फुले यांची व्यक्तिरेखा साकारण्यास मिळाल्यामुळे समाधानी आहे. 'महात्मा फुले यांची भूमिका साकारणं आणि त्यांचं व्यक्तिमत्त्व जगासमोर मांडण्याची संधी मिळणं ही माझ्यासाठी फार सन्मानाची गोष्ट आहे. एखाद्या बायोपिकमध्ये महत्त्वाची भूमिका साकारण्याची ही माझी पहिलीच वेळ आहे. जोतिरावांची व्यक्तिरेखा साकारणं माझ्यासाठी मोठं आव्हान आहे. पण, ते प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व असल्यानं मी त्यांनी भूमिका साकारण्यासाठी मी खूप उत्सुक आहे.' अशी प्रतिक्रिया प्रतीकनं दिली आहे. प्रतीकनं पुढे सांगितलं की, 'चित्रपटाची कथा ऐकल्यानंतर हा चित्रपट करण्यास मी लगेच होकार दिला होता. काही पात्रांवर काही कलाकारांची नावं लिहिलेली असतात. अनंत सरांनी या भूमिकेसाठी माझी निवड केली याचा मला खूप आनंद आहे. महात्मा फुले आणि सावित्री फुले यांनी सामाजिक बदलांसाठी जो संघर्ष केला तो आजच्या पिढीला समजला पाहिजे, यासाठी निर्मात्यांनी पुढाकार घेतला याचाही मला खूप आनंद आहे.'
एकूणचं आनंद महादेवन यांच्यासारखे दिग्दर्शक आणि पत्रलेखा व प्रतीक गांधी यांच्यासारखे मुरलेले कलाकार 'फुले' चित्रपटात दिसणार असल्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.