जयपुर, २९ डिसेंबर २०१८- सध्या लग्नाचा सिझन सुरू आहे. बाहुबलीचे दिग्दर्शक राजामौली यांनी जयपुरमध्ये त्यांचा मुलगा कार्तिकेयचं डेस्टिनेशन वेडिंग करत आहे. यावेळी अख्खी दाक्षिणात्य सिनेसृष्टी जयपुरमध्ये दाखल झाली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
स्टार दिग्दर्शक एस. एस. राजामौली सध्या भलतेच खुश आहेत. राजामौली यांच्या मुलाने एस. एस. कार्तिकेयने दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेते जगपती बाबू यांच्या भाचीसोबत साखरपुडा केला आणि आता दोघं लग्नबंधनात अडकत आहेत. उद्या ३० डिसेंबरला दोघं जयपूरमध्ये विवाहबंधनात अडकणार आहेत. या लग्नासाठी सुष्मिता सेनपासून, सुपरस्टार प्रभास, अनुष्का शेट्टी यांनी हजेरी लावली आहे.
राजामौली यांचं संपूर्ण कुटुंब गुरुवारी जयपुरला गेलं. कार्तिकेय नवऱ्या मुलीला आणण्यासाठी खास जयपुर विमानतळावर गेला होता. यावेळी तो पुजासाठी खास फुलांचा गुच्छ घेऊन गेला होता. भारतीय सिनेसृष्टीसाठी हे वर्ष लग्नाचं वर्षच राहिलं. नुकतेच प्रियांका चोप्रा आणि दीपिका पदुकोणचं लग्न झालं. याआधी अनुष्का शर्मा, सोनम कपूर, नेहा धुपिया, हिमेश रेशमिया यांसारख्या बॉलिवूड सेलिब्रेटींनी लग्न केलं. आता दक्षिणसिनेसृष्टीतील नावाजलेले दिग्दर्शक राजामौली आपल्या घरी मोठ्या धूमधडाक्यात सून घेऊन येणार आहेत.