मुंबई,24ऑक्टोबर- 94 व्या अकॅडमी पुरस्कारासाठी (94th Academy Awards) भारताने अधिकृत प्रवेशासाठी तमिळ चित्रपट ‘कूझांगल'(Koozhangal) ची निवड केली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन विनोताराज पी.एस. यांनी केलं आहे. हा चित्रपट एका पतीच्या कथेवर आधारित आहे जो दारू प्यायल्यानंतर पत्नीला मारहाण करतो. ज्यामुळे त्याची पत्नी वैतागून घर सोडते आणि मग तो माणूस आपल्या लहान मुलाला घेऊन तिला शोधून परत आणण्यासाठी निघतो.
‘कूझांगल' या चित्रपटात चेल्लापंदी आणि करूथादैयान हे नवीन कलाकार आहेत. तर विघ्नेश, शिवन आणि नयनतारा निर्मित हा चित्रपट आहे. फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाच्या सरचिटणीस सुपर्णा सेन यांनी पीटीआय-भाषाला सांगितलं की, 'कुझंगल' हा यावर्षीचा ऑस्करसाठी भारताचा अधिकृत चित्रपट आहे. त्याची निवड चित्रपट निर्माते शाजी एन. करुण यांच्या नेतृत्वाखालील 15 सदस्यीय ज्युरीने एकमताने केली आहे.
ऑस्कर निवडीच्या शर्यतीत कोणत्या चित्रपटांचा होता समावेश-
मल्याळम चित्रपट 'नयातू', तमिळ चित्रपट 'मंडेला', चित्रपट निर्माते शूजित सरकारचा 'सरदार उधम', विद्या बालनचा 'शेरनी', फरहान अख्तरचा 'तुफान', कॅप्टन विक्रम बत्रांच्या जीवनावर आधारित 'शेरशाह' आणि मराठी चित्रपट 'गोदावरी' असे एकूण 14 चित्रपट ऑस्कर निवडीच्या शर्यतीत होते.
विग्नेश शिवन यांचं ट्वीट-
There’s a chance to hear this!
“And the Oscars goes to …. “ Two steps away from a dream come true moment in our lives …. ❤️❤️#Pebbles #Nayanthara @PsVinothraj @thisisysr @AmudhavanKar @Rowdy_Pictures Can’t be prouder , happier & content pic.twitter.com/NKteru9CyI — Vignesh Shivan (@VigneshShivN) October 23, 2021
चित्रपट निर्माता शिवनने चित्रपटाच्या निवडीची बातमी ट्विटरवर शेअर केली आहे. त्यांनी ट्विटमध्ये लिहिलं की, 'कदाचित, हे ऐकण्याची संधी मिळेल .... आणि ऑस्कर पुरस्कार दिला जातो…. तुमच्या आयुष्यातील स्वप्ने सत्यात उतरवण्यापासून ते फक्त दोन पावले दूर आहे.'' विनोतराज म्हणाले की, तुमच्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल मी कृतज्ञ आहे. त्यांनी ट्विट केल की, 'ही बातमी मिळण्यापेक्षा आनंददायक काहीही असू शकत नाही.'
( हे वाचा:Oscar 2022 साठी 'शेरनी' आणि 'सरदार उधम'ला मिळालं नामांकन;Academy ... )
कधी होणार ऑस्कर सोहळा-
94 वा अकॅडमी पुरस्कार सोहळा 27 मार्च 2022 रोजी लॉस एंजेलिस येथे होणार आहे. अद्याप कोणत्याही भारतीय चित्रपटाला ऑस्कर पुरस्कार मिळालेला नाही. यापूर्वी 2001 मध्ये सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपटाच्या श्रेणीत शेवटच्या पाचमध्ये पोहोचलेला चित्रपट 'लगान' होता. 'मदर इंडिया' (1958) आणि 'सलाम बंबई' (1989) हे टॉप 5मध्ये स्थान बनवणारे इतर चित्रपट आहेत. लिजो जोस पेलिसरी दिग्दर्शित मल्याळम चित्रपट 'जल्लीकट्टू' 2021 मध्ये भारताकडून नामांकित केला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Entertainment, Oscar award