मुंबई, 10 मे- भारतीय सिनेसृष्टीत असे काही कलाकार आहेत ज्यांना त्यांच्या आवाजावरुनही ओळखलं जातं. आपल्या आवाजातील अनोख्या शैलीने या कलाकारांनी लोकांना भुरळ पाडली होती. त्यातीलच एक अभिनेते म्हणजे दिवंगत ओम पुरी होय. दमदार अभिनय आणि दमदार आवाजाने समृद्ध असलेले ओम पुरी आज आपल्यात नसले तरी त्यांच्याशी निगडित किस्से आणि आठवणी चाहत्यांमध्ये नेहमीच चर्चेत असतात. ओम पुरी यांनी दोन लग्न केली होती. 1990 मध्ये, त्यांनी अन्नू कपूरची बहीण सीमा कपूरशी लग्न केलं होतं. परंतु अवघ्या काही महिन्यांनंतर हे लग्न संपुष्ठात आलं. यानंतर त्यांनी नंदितासोबत दुसरं लग्न केलं होतं. नंदिता या व्यवसायाने पत्रकार होत्या. ओम पुरी यांनी तिच्या बुद्धिमत्तेने आकर्षित होऊन तिच्याशी लग्न केलं होतं. नंदिता ही त्यांच्यापेक्षा तब्बल 16 वर्षांनी लहान होती. परंतु दुर्दैवाने लग्नाच्या 26 वर्षांनंतर हे दुसरं लग्नसुद्धा तुटलं होतं. ओम पुरीं यांचं पहिलं लग्न मोडण्यामागे नंदिताच कारणीभूत असल्याचं सांगितलं जातं. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, नंदिताच्या पुस्तकामुळे ओम पुरींच्या आयुष्यात भूकंप आला होता. त्यांची प्रतिमा प्रचंड खराब झाली होती. पुढे या पुस्तकाने दोघांनाही कायमचं विभक्त केलं. अखेर कालांतराने या दोघांचा घटस्फोट झाला होता. (हे वाचा: सैफ अली खानच्या समोरच करीना-शाहिदचा आमनासामना,अशी झाली दोघांची अवस्था, Video Viral ) खरं सांगायचं तर, ओम पुरी यांची पत्नी नंदिता पुरी यांनी त्यांची बायोग्राफी ‘अनलाइकली हीरो: ओम पुरी’ प्रकाशित केल्यानंतर अभिनेत्याची प्रतिमा खराब होऊ लागली होती. हे पुस्तक नंदिताने स्वतः लिहिले आहे. यामध्ये त्यांनी ओमपुरींशी संबंधित प्रत्येक लहान-मोठ्या गोष्टींचा उल्लेख केला आहे. ओम पुरी यांच्या बालपणापासून ते तारुण्यापर्यंतचे सर्व रंजक किस्से त्यांनी अगदी जवळून सांगितले आहेत. मात्र, या पुस्तकाचे प्रकाशन झाल्यापासूनच दोघांमध्ये वाद सुरु झाला होता. आणि त्याचा शेवट खूप वेदनादायक झाला. नंदिताच्या पुस्तकाने ओम पुरींचं आयुष्य बदललं होतं.कारण या पुस्तकात ओमपुरींच्या विवाहबाह्य संबंधांवर बरंच काही लिहण्यात आलं आहे. हे पुस्तक 2009 मध्ये प्रकशित करण्यात आलं होतं. नंदिताने लिहिलेल्या बायोग्राफीनुसार, ओम पुरी यांचे वयाच्या अवघ्या 14 व्या वर्षी त्यांच्या घरातील मोलकरणीसोबत संबंध होते. जिचं वय 55 होतं. ओम पुरींना ती स्त्री खूप आवडत असे कारण ती बाई त्यांचे वडील आणि घरातील इतर लोकांची काळजी घेत असे. हे पुस्तक प्रसिद्ध होताच ओम पुरी चांगलेच वादात सापडले होते. त्यांच्या प्रतिमेवर लोकांनी प्रश्न उपस्थित केले होते.परंतु ओम पुरी यांनी अनेक मुलाखतींमध्ये याबद्दल बोलताना म्हटलं होतं की, त्यांच्या पत्नीने जाणूनबुजून त्यांची प्रतिमा खराब करण्यासाठी हा कट रचला आहे.
एका मुलाखतीत ओम पुरी यांनी दुसरी पत्नी नंदितावर आरोप केला होता की, पुस्तक प्रकाशित करण्यापूर्वी त्यांना त्याची प्रत दाखवली गेली नाही. पुस्तकाबद्दल विचारल्यावर नंदिता नेहमी टाळायची आणि सगळं बरोबर असल्याचं सांगायची. हे पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर मात्र ओम पुरी आणि नंदिता यांच्यातील संबंध बिघडू लागले होते.अखेर लग्नाच्या 26 वर्षांनंतर या दोघांनी 2016 मध्ये घटस्फोट घेतला होता. दुर्दैवाने घटस्फोटाच्या काही महिन्यानंतर म्हणजेच 2017 मध्ये ओम पुरी यांचं निधन झालं होतं.