मुंबई, 05 जुलै : भारताने 1983साली जिंकलेल्या वर्ल्ड कपवर बनत असलेल्या सिनेमात आता अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीचीही वर्णी लागण्याची शक्यता आहे. या सिनेमात नवाझ हा भारतीय क्रिकेट टीमच्या तत्कालीन कोचच्या भूमिकेत दिसणारे. नवाझने या भूमिकेबाबत आपल्याला विचारणा झाल्याचं मान्य केलंय. मात्र अद्याप त्याने या भूमिकेसाठी होकार दिलेला नाही. मात्र भारतीय क्रिकेटकडे पाहण्याच्या जगाचा दृष्टिकोन बदलणारी घटना पडद्यावर आणायला आपल्याला नक्की आवडेल असं त्याने सांगितलंय. या सिनेमात रणवीर सिंग कपिल देवच्या भूमिकेत आहे. कबीर खान सिनेमाचं दिग्दर्शन करतोय. सिनेमा पुढच्या वर्षी रिलीज होईल. नवाजचं ‘अॅन ऑर्डिनरी लाईफ - अ मेमॉयर’ पुस्तक त्याच्या आणि निहारिकाच्या प्रेमप्रकरणामुळे गाजलं. नवाज हा उत्तम अभिनेता आहे. मांझी सिनेमासाठी त्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळालाय. बदलापूर, बजरंगी भाईजान, तलाश, पानसिंग तोमर अशा अनेक सिनेमांतल्या त्याच्या भूमिका कायमच ठसा उमटवून गेल्या. आता त्याच्या ठाकरे या सिनेमाकडून बऱ्याच अपेक्षा आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.