मुंबई, 25 आॅक्टोबर : नागराज मंजुळेंचा कुठलाही सिनेमा येणार म्हटलं की सिनेमाबद्दल अपेक्षा वाढतातच. अगोदर फॅण्ड्री, नंतर सैराटनं या अपेक्षांमध्ये आणखी वाढ केलीय. येत्या 16 नोव्हेंबरला त्यांचा 'नाळ' रिलीज होतोय. यावेळी या सिनेमाचं दिग्दर्शन नागराज करत नाही. त्यांनी फक्त निर्मिती केलीय आणि अभिनयही केलाय.
सुधाकर रेड्डी दिग्दर्शित नाळचा ट्रेलर रिलीज झालाय. एका छोट्या मुलाच्या भावविश्वाभोवती हा सिनेमा फिरतोय. ट्रेलरमधून एकच गोष्ट जाणवते ती म्हणजे मुलाला आपली आई आपल्यावर प्रेम करत नाही असं वाटतंय. ती सारखी त्याच्या अंगावर ओरडते, त्याचा राग राग करतेय. त्यामुळे त्याच्या मनात एक प्रकारची असुरक्षितता, प्रेमाची आस जाणवतेय. हा ट्रेलरच काळजाला हात घालतो.
नागराज यांनी सिनेमा दिग्दर्शित केला नसला तरी सिनेमाला नागराज टच जाणवतोय.नाळबद्दल जास्त काही सांगायला ते तयार नव्हतेच. तरीही ते म्हणाले, 'नाळ एका छोट्या मुलाचं भावनिक विश्व उलगडणारा सिनेमा आहे. त्याचं हळवं भावविश्व आहे. दिग्दर्शकानं तो असा काही मांडलाय की मला वाटलं ही माझीच गोष्ट आहे. एखादा सिनेमा आपण पाहतो, एखादी कविता वाचतो, तेव्हा अनेकदा आपण अंतर्मुख होतो. आपल्याला वाटतं ही आपलीच गोष्ट आहे. तसं नाळ बघून होतं.'
मग हा सिनेमा नागराज यांचीच गोष्ट आहे का? यावर ते म्हणाले, 'तुमची गोष्ट म्हणजे काही चरित्र नसतं. त्यातला एखादा भाग असतो. त्याला अनेक पैलू असतात. पदर असतात.सैराट बघूनही मला अनेकांनी सांगितलं, ही तर आमचीच गोष्ट आहे.
नागराज पुढे म्हणाले, 'सिनेमा यशस्वी व्हायला हवा, हे वाटत असतं. पण तुम्ही अर्ध काम करून सिनेमा यशस्वी झाला, तर मनाला लागतं. 100 टक्के काम करून यशस्वी झाला तर आनंद होतो. पण 100 टक्के काम करून यशस्वी नाही झाला तरी खंत वाटत नाही.'
'बधाई हो'तली आई नीना म्हणते, सिंगल मदर राहण्याचा माझा निर्णय चुकीचा होता
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.