मुंबई, 12 ऑक्टोबर : धकाधकीच्या आयुष्यात विरंगुळा प्राप्त करुन देणारा प्रकार म्हणजे नाच. भारतीय संस्कृतीमध्ये अगदी प्राचीन काळापासून नृत्याला मोठं महत्त्व आहे. देव-देवता असो किंवा नंतरच्या काळातील राजे- महाराजे सर्वांच्याच कालखंडातमध्ये नृत्य या कलेची विशेष जोपासना झाली. त्याला राजाश्रय आणि लोकाश्रय होता. आधुनिक काळात या नृत्याचे वेगवेगळे प्रकार उदयाला आले. सिनेमा, पाश्चात्य संगीत, टीव्ही वाहिन्या, डान्स स्पर्धा यामुळे हे प्रकार भारतामध्येही चांगलेच रुजले. लोकप्रिय झाले. विशेषत: तरुणांमध्ये आधुनिक डान्सची मोठी क्रेझ आहे. अनेक जण याच क्षेत्रात करिअर करण्यासाठी धडपडतात. त्यामधील मोजकीच मंडळी हे यशस्वी झाले आहेत. ईश्वर तिवारी हा 24 वर्षांचा मुंबईकर तरुण या क्षेत्रात यशस्वी भरारी घेणारा डान्सर आहे. त्यानं मोठ्या कष्टानं हे स्थान मिळवलंय. आता तर तो जागतिक स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे.
कसा सुरू झाला प्रवास?
जिद्द, चिकाटी आणि मेहनत असली की यश हमखास मिळते. ईश्वरचा आजवरचा प्रवास हेच सांगतो. . त्याच्या आयुष्यात सुद्धा अनेक चढउतार आले. या सर्व प्रवासात निराश न होता तो पुढे चालत राहिला. 7 वीमध्ये असताना त्याला ब्रेक डान्स या प्रकाराची गोडी लागली. 2005 साली त्याने एका आंतरराष्ट्रीय ब्रेक डान्स स्पर्धेचा व्हिडीओ पाहिला. हा व्हिडीओ पाहून त्यानं सरावाला सुरूवात केली. शिवाजी पार्क, मुंबईतील बागा, डान्स स्टुडिओ जिथं संधी मिळेल तिथं ईश्वर ब्रेक डान्सचा सराव करत असे.
ईश्वरला तब्बल 12 वर्षांनी म्हणजे 2017 साली पहिला मोठा ब्रेक मिळाला. तो दक्षिण कोरियात स्पर्धेसाठी गेला. त्यानंतर त्याने अनेक देशांमध्ये त्यानं ब्रेक डान्सच्या स्पर्धा जिंकल्या आहेत. 2005 साली ज्या स्पर्धेचा व्हिडीओ पाहून त्यानं या क्षेत्रात पाऊल टाकलं त्या स्पर्धेच्या सरावाला त्यानं सुरूवात केली. दोन वेळा तो ही स्पर्धा हरला. पण, 'प्रयत्नाअंती परमेश्वर' ही म्हण त्याने खरी करून दाखवली.
नाशिकची लेक जगात भारी! 14 व्या वर्षीच मिळवली 2 आंतरराष्ट्रीय विद्यापीठाची डॉक्टरेट, Video
पहिला भारतीय
ईश्वरला यावर्षी न्यूयॉर्कमध्ये होणाऱ्या 'द रेड बुल बी.सी. वनच्या वर्ल्ड फायनलमध्ये प्रवेश मिळालाय. त्याला वाईल्ड कार्डने एन्ट्री मिळालीय. विशेष म्हणजे या स्पर्धेत प्रवेश मिळालेला ईश्वर हा पहिला भारतीय आहे.
'माझ्या बाबांचा 2020 साली मृत्यू झाला. माझ्यासाठी ते वर्ष खूपच खराब गेलं. त्या अनुभवातून माझ्यात संमजसपणा आला. मी माझ्या कुटुंबाची जबाबदारी स्विकारली आहे. मला खूप मोठं व्हायचं आहे. माझं उदाहरण सर्वांसमोर ठेवायचं आहे, अशी भावना ईश्वरने व्यक्त केली.
अनाथाश्रमात राहिली, नवऱ्यानं सोडलं तरी 'ती' पहिल्याच प्रयत्नात झाली पोलिसात भरती, Video
ईश्वर लॉकडाऊननंतर यावर्षी दक्षिण कोरियात झालेल्या स्पर्धेत सहभागी झाला होता. आता तो न्यूयॉर्कच्या स्पर्धेची तयारी करतोय. या स्पर्धेत आणि पुढील काळात अनेक खडतर आव्हानं पूर्ण करायचे असल्याची त्याला जाणीव आहे. तो हे आव्हान यशस्वी पूर्ण करेल अशी खात्री त्याचा आजवरचा संघर्ष पाहाणाऱ्या सर्वांना आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Dancer, Digital prime time, Mumbai, Success story