मुंबई, 12 मे- मराठी चित्रपटसृष्टीतील गोंडस आणि तितकीच प्रतिभावान अभिनेत्री म्हणून मृण्मयी देशपांडे ला ओळखलं जातं. मृण्मयीने अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारत प्रेक्षकांवर आपली छाप पाडली आहे. मृण्मयीचा मोठा चाहतावर्ग आहे. मृण्मयी सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. आता पुन्हा एकदा अभिनेत्री एका हटके कारणामुळे चर्चेत आली आहे. मृण्मयी बरेच दिवस पडद्यावर झळकलेली नाहीय. यामागचं खरं कारण आता समोर आलं आहे. मृण्मयीने स्वतः एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये अभिनेत्री सध्या कुठे आहे आणि काय करते याचा उलघडा झाला आहे. सर्वसामान्य लोक असो किंवा कलाकार प्रत्येक व्यक्ती उद्योग-व्यवसायाच्या निमित्ताने तर काही शिक्षणाच्या निमित्ताने शहरात स्थायिक होत असतात. परंतु अनेकांना आता शहरापेक्षा आपल्या छोट्या-छोट्या गावांची भुरळ पडताना दिसून येत आहे. अनेक कलाकार असे आहेत ज्यांनी निसर्गाच्या सानिध्यात फार्म हाऊस किंवा शेती करत ग्रामीण भागाशी आपली नाळ जोडली आहे. यामध्ये आता अभिनेत्री मृणमयी देशपांडेच्या नावाची भर पडली आहे. मृण्मयी देशपांडेसुद्धा मुंबईतील धकाधक्कीच्या आयुष्यातून ब्रेक घेत निसर्गाच्या सानिध्याचा रस्ता धरला आहे. (हे वाचा: Gautami Patil: ‘तुम्हाला कधीच त्रास देणार नाही प्लीज…थेट सोशल मीडियावर तरुणाने गौतमीकडे केली ‘ती’ मागणी ) मराठमोळी अभिनेत्री मृण्मयी देशपांडेलासुद्धा थंड हवेच ठिकाण असणाऱ्या निसर्गरम्य महाबळेश्वरची भुरळ पडलेली दिसून येत आहे. अभिनेत्रीने सध्या मुंबईपासून दूर जात महाबळेश्वरमध्ये आपला संसार थाटला आहे. मृण्मयी गेल्या काही दिवसापासून मुंबई नव्हे तर महाबळेश्वरमध्येच राहात आहे. अभिनेत्रीच्या एका पोस्टमधून या गोष्टीचा खुलासा झाला आहे. सध्या मृण्मयीच्या या पोस्टची मोठी चर्चा होत आहे. तसेच तिच्या या निर्णयाचं अनेकांना कौतुकही वाटत आहे. विशेष म्हणजे मृण्मयीची बहीण अभिनेत्री गौतमी देशपांडेसुद्धा सध्या तिच्यासोबत महाबळेश्वरमध्ये आहे.
मृण्मयी देशपांडेने स्वतः महाबळेश्वरमध्ये आपलं एक सुंदर असं घरकुल तयार केलं आहे. अगदी निसर्गाच्या सानिध्यात अभिनेत्रीचं हे घर उभारलं आहे. घराच्या आजूबाजूला सुंदर अशी हिरवळ आहे. विशेष म्हणजे मृण्मयी याठिकाणी शेतीसुद्धा करत आहे. अभिनेत्री स्वतः याठिकाणी शेतीची कामे करताना, आजूबाजूची सफाई करताना दिसून येते. मृण्मयीच्या चाहत्यांना तिचा हा अंदाज प्रचंड पसंत पडला आहे. अनेकांनी अभिनेत्रींच्या या निर्णयाचं तोंडभरुन कौतुक केलं आहे.
मराठीतील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये मृण्मयी देशपांडेच्या नावाचा समावेश होतो. मृणमयी चित्रपटांसोबतच सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. अभिनेत्री आपल्या व्यावसायिक आणि खाजगी आयुष्याबाबत विविध माहिती सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असते. मृण्मयीच्या प्रत्येक पोस्टची तिच्या चाहत्यांना उत्सुकता असते. अभिनेत्री कधी फोटोशूट करते तर कधी रील्स, तर कधी अभिनेत्री बहीण गौतमी देशपांडेसोबत गाण्यांची जुगलबंदी करतांना दिसून येते. या दोघींचे गोड व्हिडीओ चाहते मोठ्या आवडीने पाहतात.मृण्मयी देशपांडेने अद्याप चित्रपटसृष्टी सोडलेली नसून फक्त थोडासा ब्रेक घेतल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांना थोडासा दिलासा मिळाला आहे.