मुंबई 22 सप्टेंबर: ज्येष्ठ अभिनेत्री आशालता यांचं कोरोनामुळे निधन झाल्याने मराठी चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. या घटनेमुळे चित्रपट आणि मालिकांचं शुटिंग आणि सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. आशालता यांना सुरक्षेच्या नियमांचं पालन न केल्यामुळे आपला जीव गमवावा लागला. कोविड नियमांचं पालन न केल्यामुळेच ही घटना घडली असा आरोप मनसेच्या चित्रपट आघाडीने केला आहे.
यापुढे शुटिंगदरम्यान नियमांच पालन होत नाही असं आढळून आल्यास शुटिंग बंद पाडू असा इशार आघाडी महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेना आघाडीचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी दिला आहे.
खोपकर यांनी मालिकांचे निर्माते आणि मनोरंजन वाहिन्यांच्या मालकांना एक पत्र लिहून हा इशारा दिला आहे. कुठल्याही परिस्थितीत कोविड नियमांचं पालन झालंच पाहिजे. या नियमांचं पालन केलं नाही त्यामुळे 83 वर्षांच्या आशालता यांचा मृत्यू झाला असं त्यांनी या पत्रात म्हटलं आहे.
ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचं उपचारादरम्यान मंगळवारी(22 सप्टेंबर) निधन झालं. सोमवारी त्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर त्या व्हेंटिलेटरवर होत्या. त्यांच्या निधनानंतर मराठी चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. वयाच्या 82 व्या वर्षी त्यांचं निधन झालं.
अनेक मराठी चित्रपटांमध्ये आशालता यांनी चांगल्या भूमिका केल्या आहेत. अनेकदा त्या आईच्या भूमिकेत दिसल्या. नाटकांपासून त्यांच्या करिअरची सुरुवात झाली. त्यांनी 100 हून अधिक मराठी व हिंदी चित्रपटात काम केले आहे. त्या सध्या एका खासगी मनोरंजन वाहिनीवरील 'आई माझी काळुबाई' या मालिकेचं शूटिंग करीत होत्या. साताऱ्यातील लोणणं येथे या मालिकेचं शूटिंग सुरू होतं. त्यावेळी मुंबईतून एका डान्स ग्रुप तेथे चित्रीकरणासाठी गेला होता. त्यातून कोरोनाचा फैलाव झाल्याची प्राथमिक शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे चित्रीकरणादरम्यान त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे सांगितले जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, MNS