मुंबई 16 फेब्रुवारी : मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty) हे बॉलिवूड सिनेसृष्टीतील एक नामांकित अभिनेते म्हणून ओळखले जातात. जबरदस्त अॅक्शन आणि डान्स करुन अवाक् करणाऱ्या मिथुनदांनी तब्बल दोन दशकं प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. गेल्या काही काळात सिनेसृष्टीपासून दूर असलेले मिथुनदा अचानक पुन्हा एकदा चर्चेत येऊ लागले आहेत. नुकतेच त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) प्रमुख मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांची भेट घेतली. या भेटीमुळं आता ते अभिनयाचं क्षेत्र सोडून राजकारणामध्ये आपलं नशीब आजमावून पाहणार की काय? अशी चर्चा रंगू लागली. मात्र मिथुनदांनी पहिल्यांदाच एखाद कार्यक्षेत्र सोडलेली नाही. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल त्यांनी एक नक्षली आंदोलक (Naxalite) म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. पण त्यादरम्यान अशी एक घटना घडली की ज्यामुळं त्यांना आपला मार्ग बदलावा लागला.
मिथुन चक्रवर्ती यांचा जन्म 1950 साली कोलकातामधील एका लहानशा गावात झाला होता. लहानपणापासूनच त्यांच्या विचारांवर नक्षली आंदोलकांचा खूप मोठा प्रभाव होता. आंदोलक होऊन एखादा पराक्रम करण्याची स्वप्न ते पाहात असत. परंतु याच दरम्यान अशी एक घटना घडली की ज्यामुळं त्यांचं संपूर्ण आयुष्य ढवळून निघालं. एका आंदोलनादरम्यान त्यांच्या मोठ्या भावाला जबरदस्त विजेचा झटका बसला अन् त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेचा त्यांच्या मनावर खोल परिणाम झाला. अन् त्यांनी नक्षली आंदोलकांच्या विचारांचा त्याग करुन मनोरंजन क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला.
अवश्य पाहा - ब्युटी क्वीन करायची लहान मुलांचं अपहरण; सापळा रचून पोलिसांनी केली अटक
मिथुनदा कसे झाले सुपरस्टार अभिनेता?
मिथुनदांनी पुण्यातील फिल्म इंस्टीट्यूटमधून अभिनयाचं शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलं. त्यानंतर त्यांनी रंगभूमीवरील नाटकांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. याच दरम्यान 1976 साली त्यांना ‘मृगया’ या बंगाली चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. लक्षवेधी बाब म्हणजे पहिल्याच चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. परिणामी बॉलिवूड निर्मात्यांचं लक्ष त्यांच्या दिशेने वळलं. अन् त्याच वर्षी त्यांना ‘दो अंजाने’ या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर ‘मुक्ती’, ‘हमारा संसार’, ‘अमर दीप’, ‘प्रेम विवाह’ इथपासून अगदी रोहित शेट्टीच्या ‘गोलमाल रिटन्स’ पर्यंत त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. मिथुनदा एक उत्तम मार्शलआर्टिस्ट होते. त्यामुळे आपल्या अनोख्या अॅक्शन शैलीच्या जोरावर त्यांनी एक वेगळाच चाहतावर्ग निर्माण केला. गेली अनेक वर्ष चित्रपटांतून प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या मिथुनदांनी आज मोहन भागवत यांची भेट घेतली. त्यामुळे आता ते अभिनयसोडून राजकारणार पदार्पण करणार की काय? अशी चर्चा रंगू लागली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, RSS, Rss mohan bhagwat