मुंबई, 29 मार्च- बॉलिवूडचा (Bollywood) आघाडीचा गायक मिका सिंह (Mika singh) कायम वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतो. कधी त्याची गाणी चर्चेचा विषय असतात तर कधी त्याची अफेअर्स आणि इतर उद्योग. आजवर त्याचे नाव कायमच अनेक मुलींशी जोडलं गेलं आहे. अगदी चाहत खन्नापासून आकांक्षा पुरीपर्यंत अनेकींशी अफेअरच्या चर्चा रंगल्यानंतरही मिका त्याच्या रिलेशनविषयी कधीही मोकळेपणाने बोललेला नाही. पण आता मात्र त्याला याबाबतीत बोलायचं आहे. आता होणार आहे, मिका सिंह याचं स्वयंवर. जिथे तो आपल्यासाठी सुयोग्य पत्नी शोधणार आहे. हे स्वयंवर म्हणजे एक टीव्हीचा कार्यक्रम आहे. अर्थात, त्याआधी मिका त्याच्या या कार्यक्रमाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. नुकतंच त्याने टाइम्स ऑफ इंडियाला एक मुलाखत दिली होती. त्यात तो म्हणाला की, गेल्या 20 वर्षांत त्याच्याकडे लग्नाचे जवळपास 150 प्रस्ताव आले होते. पण मोठा भाऊ दलेर मेहंदीसमोर आपल्या गर्लफ्रेंडना उभं करण्याची कधी हिंमतच झाली नाही. त्यामुळेच आता मिका स्वयंवरातून आपल्या जीवनाच्या जोडीदाराची निवड करणार आहे. या स्वयंवराबद्दल मिका म्हणाला, ‘मला वाटतं, बऱ्याच लोकांना असं स्वयंवर करावंसं वाटत असेल. पण सगळ्यांनाच अशी संधी मिळत नाही. मलासुद्धा अनेक वर्षांनंतर अशी नामी संधी मिळाली आहे. खरं तर आधी हे सगळं मला पटलेलं नव्हतं. मी त्यासाठी या सगळ्यासाठी तयार होतच नव्हतो. कारण मी तर गेल्या 20 वर्षांत लग्नासाठी नाहीच म्हणत आलोय. कमीतकमी 100-150 लग्नाचे प्रस्ताव मी नाकारलेत. खरं तर याचं कारण माझं काम आहे. लोकांना वाटतं की मी फक्त मैत्रिणींबरोबर धमालमस्ती करतो, पार्टी करतो, म्हणूनच मला लग्न-बिग्न करायचं नसेल. पण तसं नाही. माझ्या कामातून मला वेळच मिळत नाही.’ मिकासिंग त्याच्या घरातल्यांचा आणि मोठा भाऊ गायक दलेर मेहंदी यांचा फार आदर करतो. तो म्हणतो, दलेर मेहंदी म्हणजे माझे मोठे बंधू पण आजपर्यंत माझ्या कुठल्या गर्लफ्रेंडला त्यांच्याकडे घेऊन जावं आणि आमच्याबद्दल सांगावं, असं कधी जमलंच नाही. माझा धीरच होत नव्हता. मोठ्यांच्या मनाविरुद्ध वागण्याची आमची पद्धतच नाही, कारण तो त्यांचा मान असतो. पण जेव्हा हा स्वयंवराचा प्रस्ताव आला तेव्हा मोठे बंधू दलेर मेहंदीच म्हणाले, ‘करून पहा. कदाचित कुणी मिळेल तुझ्या मनासारखी. तसं तर बाकी तू आमचं काही ऐकतच नाहीस.’
मिका दी वोहटी (mika di vohti) या नावाचा कार्यक्रम स्टार भारतवर लवकरच येत आहे. हा कार्यक्रम स्वयंवर पद्धतीवर आधारित आहे. या कार्यक्रमात भाग घेण्यासाठी स्पर्धकांना पहिल्यांदा नोंदणी करावी लागेल. त्यासाठी अंतिम तारीख आहे, 8 मे 2022 आहे. इच्छुक व्यक्ती स्वयंवरासाठी नोंदणी करू शकतात. तुम्हालाही स्वयंवरात सहभागी व्हायचं असेल तर व्हा सज्ज.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.