मुंबई, 7 नोव्हेंबर : साऊथ स्टार प्रभास आणि अभिनेत्री क्रिती सेनन स्टारर 'आदिपुरुष' चित्रपट सध्या मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहे. हा चित्रपटही वादाच्या कचाट्यात सापडत चालल्याचं पहायला मिळतंय. हे पाहता निर्मात्यांनी चित्रपटाच्या रिलीजबाबत मोठा निर्णय घेतला आहे. व्हीएफएक्सबद्दल सतत विरोधाला सामोरे जाणाऱ्या या चित्रपटाच्या टीमने सध्यातरी चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
'आदिपुरुष' चित्रपटाच्या निर्मात्यांनी या चित्रपटाबाबत अधिकृत निवेदन जारी केले आहे. यामध्ये त्यांनी चित्रपटाच्या न्यू रिलीज डेटविषयी सांगितलं आहे. निवेदन जारी करत निर्मात्यांनी म्हटलं, 'आदिपुरुष हा केवळ एक चित्रपट नाही, तर प्रभू श्री रामावरील आमची भक्ती आणि आमच्या गौरवशाली इतिहास आणि संस्कृतीशी असलेल्या आमच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे. आदिपुरुषच्या निर्मितीशी निगडित असलेल्या लोकांनी प्रेक्षकांना एक अद्भुत अनुभव देण्यासाठी आणखी थोडा वेळ द्यावा. आदिपुरुष आता 16 जून 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे. संपूर्ण भारताला अभिमान वाटेल असा चित्रपट बनवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. तुमचे सहकार्य, प्रेम आणि आशीर्वाद आम्हाला या रामकाजासाठी नेहमीच प्रेरणा देत आले आहे आणि यापुढेही देत राहतील.'
500 कोटींच्या बजेटमध्ये हा चित्रपट बनवला जात असून भारतीय प्रेक्षकांना त्यांच्या संस्कृतीशी संबंधित कथेसह एक अप्रतिम दृश्य अनुभव देणार असल्याचा निर्मात्यांचा दावा आहे. दिग्दर्शक ओम राऊत यांच्या 'आदिपुरुष' चित्रपटाच्या टीझरमध्ये दिसलेल्या VFX ची सोशल मीडियावर जोरदार खिल्ली उडवली गेली. यासोबतच रामायणावर आधारित या चित्रपटात तथ्यांशी छेडछाड करण्यात आल्याची चर्चा होती. अयोध्येत पूर्ण थाटामाटात प्रदर्शित झालेल्या या टीझरवर अनेकांनी आक्षेप घेतला.
दरम्यान, भूषण कुमार, ओम, प्रसाद सुतार आणि राजेश नायर यांची निर्मिती असलेला हा बिग बजेट चित्रपट आयमॅक्स आणि हिंदी, तेलुगु, तमिळ, मल्याळम आणि कन्नडमध्ये 3D आवृत्तीमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात प्रभू श्री रामची भूमिका अभिनेता प्रभास साकारणार आहे. सैफ अली खानला रावणाच्या भूमिकेसाठी आणि चित्रपटात सीतेच्या भूमिकेसाठी क्रिती सेननची निवड करण्यात आली आहे. प्रभास क्रितीच्या चाहत्यांना या चित्रपटासाठी आणखी प्रतिक्षा करावी लागणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Entertainment, Kriti sanon, Prabhas, South film, Upcoming movie