मुंबई, 2 एप्रिल- मराठीमध्ये असे अनेक विनोदी चित्रपट आहेत ज्यांनी प्रेक्षकांना नेहमीच खळखळून हसवलं आहे. या चित्रपटांचा जादू आजही महाराष्ट्राच्या प्रेक्षकांवर कायम आहे. असाच एक चित्रपट म्हणजे ‘जत्रा’ होय. जत्रा चित्रपटाने प्रेक्षकांना पोट धरून हसायला भाग पाडलं होतं.या चित्रपटाची धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. लवकरच ‘जत्रा 2’ (Jatra 2) प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आज गुढीपाडवा आणि हिंदू नववर्षाच्या शुभ मुहूर्तावर केदार शिंदे (Kedar Shinde) यांनी या चित्रपटाची घोषणा केली आहे.सोबतच कुशल बद्रिकेनेसुद्धा (Kushal Badrike) आपल्या इन्स्टाग्रामवरून आपल्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटात कुशल बद्रिकेसुद्धा असणार हे पाहून त्याचे चाहते फारच आनंदी झाले आहेत. सोशल मीडियावर सध्या कुशलच्या या पोस्टची जोरदार चर्चा आहे. कुशल बद्रिकेने आपल्या इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत लिहिलं आहे, ‘‘ह्यालगाड आणि त्यालागाडची जत्रा आनंदमयी झाली त्याला 16 वर्षाहून जास्त काळ लोटलाय.. कोंबडी पळून सुद्धा आता बरीच वर्ष झाली आहेत.. पण अजूनही तुमचा ताब्या आमच्या राजुत आहे! म्हणूनच ह्या गुढीपाव्यानिमित्त तुम्हा सर्व रसिकांसाठी एक आनंदाची बातमी घेऊन येतोय.. आपलं ठरलय.. तुमच्यासाठीच ठरवल आहे.. आम्ही सगळे मिळून तुमच्यासाठी आनंदाची मेजवानी घेऊन येतोय.. ह्या नवीन वर्षात तुम्हाला हसवायला ‘जत्रा 2’ येतोय! गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!!! अलबत्या गलबत्या कोण फोडेल’’..
‘जत्रा’ हा चित्रपट 2006 मध्ये आला होता. केदार शिंदे दिग्दर्शित आणि लिखित या चित्रपटाने संपूर्ण महाराष्ट्राला खळखळून हसवलं होतं. या चित्रपटात भरत जाधव, सिद्धार्थ जाधव आणि क्रांती रेडेकर यांच्या महत्वाच्या भूमिका होत्या. या चित्रपटात अजय-अतुलने संगीत दिलं होतं. या चित्रपटातील गाणी आजही सर्वांना थिरकायला भाग पाडतात. या चित्रपटातील ‘कोंबडी पळाली’ आणि ‘ये गं ये ये मैना’ ही गाणी तुफान लोकप्रिय झाली होती. यातील ‘कोंबडी पळाली’ या गाण्याचा हिंदी रिमेकसुद्धा बनला आहे, ज्याचं नाव आहे ‘चिकणी चमेली’. ज्यावर कतरिना कैफने जबरदस्त डान्स केलं आहे. तसेच ‘ये गं ये ये मैना’ या गाण्याचासुद्धा हिंदी रिमेक बनला आहे ज्याचं नाव आहे ‘मेरा नाम मेरी है..’. या अप्रतिम यशानंतर आता नववर्षात ‘जत्रा 2’ सर्वांच्या भेटीला येणार आहे.

)







