मुंबई, 18 मार्च- मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांचं निधन झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. त्यांनी कोल्हापुरात अखेरचा श्वास घेतला. त्यांचं वय 88 वर्षे होतं. अनेक चित्रपटांमधून त्यांनी प्रेक्षकांवर आपली छाप पाडली आहे.
ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांनी मराठीतील अनेक चित्रपटांमध्ये सहाय्यक अभिनेत्याची भूमिका साकारत लोकांच्या मनावर आपला ठसा उमठवला आहे. त्यांनी थोड्या-थोडक्या नव्हे तर तब्बल 300 सिनेमांमध्ये काम केलं आहे.गेल्या अनेक वर्षांपासून ते चित्रपट सृष्टीपासून दूर होते. भालचंद्र कुलकर्णी हे मूळचे कोल्हापूरचे होते. ते सध्या कोल्हापुरातच वास्तव्यास होते. वयाच्या 88 व्या वर्षी कोल्हापुरातच त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.
गाजलेल्या चित्रपटांमध्ये केलंय काम-
भालचंद्र कुलकर्णी यांनी नाटक ते चित्रपट दोन्ही क्षेत्रात आपली छाप पाडली आहे. त्यांनी मुंबईचा जावई, सोंगाड्या, खतरनाक, असला नवरा नको गं बाई, थरथराट अशा अनेक मराठी गाजलेल्या चित्रपटांमध्ये महत्वाची भूमिका साकारली आहे. त्यांच्या रांगड्या व्यक्तिमत्वाने त्यांनी नेहमीच प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे.
भालचंद्र कुलकर्णी हे अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे संचालकसुद्धा होते. त्यांच्या जाण्याने मराठी मनोरंजनसृष्टीत कधीही न भरुन निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. या सिनेसृष्टीत त्यांनी दिलेलं योगदान नेहमीच महत्वाचं असणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Entertainment