मुंबई, 2 ऑक्टोबर : आजच्या दिवशी आपण राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती साजरी करतो. त्यामुळे आज सगळीकडे गांधीमय वातावरण झालेलं पहायला मिळत आहे. या खास दिवसाची संधी साधत मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ जाधवनं चाहत्यांसोबत आनंदाची बातमी शेअर केली आहे. सोशल मीडियावर सिद्धार्थनं आपल्या आगामी चित्रपटाची घोषणा करत टीझर शेअर केला आहे. महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त बापूंशी घट्ट नाते असलेल्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. या चित्रपटाचे नाव ‘गांधी टॉक्स’ आहे. सिद्धार्थ जाधवनं या चित्रपटांचा टीझर त्याच्या अधिकृत इन्स्टाग्रामला शेअर केला आहे. या चित्रपटामध्ये सिद्धार्थ जाधव विजय सेतूपती, अरविंद स्वामी, आदिती राव हैदरी या कलाकारांसोबत काम करणार आहे. त्याच्या आनंदाच्या बातमीने त्याचे चाहते खूप खूश आहेत. हेही वाचा - ‘किडनी निकामी, डायलिसिससाठी पैसे नाहीत’; अभिनेत्री अनाया सोनीची प्रकृती चिंताजनक ‘गांधी टॉक्स’ या चित्रपटाचं दिग्दर्शक किशोर पांडुरंग बेलेकर यांनी केलं आहे. हा एक डार्क कॉमेडी असेल असे टीझरमध्ये सांगण्यात आले आहे. चित्रपटाचे नाव गांधी टॉक्स असे असले तरी हा एक मूकपट असणार आहे. म्हणजेच यात कोणताही कलाकार काहीही बोलताना दिसणार नाही. हावभाव आणि हावभावातच अभिनय केला जाईल.
दरम्यान, तामिळ, तेलगू, कन्नड, हिंदी आणि मल्याळम व्यतिरिक्त मराठी भाषेतही तो प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. सिद्धार्थच्या या पोस्टवर अनेक मराठी कलावंतानी कमेंट करत त्याचं कौतुक केलं आहे.