मुंबई, 18 सप्टेंबर : मनोरंजन विश्वास एकामागून एक धक्के मिळत आहे. युवा अभिनेता प्रशांत लोखंडे नंतर आता प्रसिद्ध टीव्ही अभिनेता सबरी नाथचं गुरुवारी निधन झालं. मल्याळम टीव्ही अभिनेता सबरी नाथचं 43 व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झाल्याची माहिती मिळाली आहे. सबरी नाथच्या जाण्यानं मल्याळम मनोरंजन विश्वातील एक हरहुन्नरी अभिनेता हरपल्याची भावना सर्वांच्या मनात आहे.
सबरी नाथला त्रिवेंद्रम इथल्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. सबरी नाथ मागे त्याची पत्नी आणि दोन मुली असं कुटुंब आहे. सबरीच्या अशा अचानक जाण्यामुळे मनोरंजन विश्वात शोकाकूल वातावरण आहे.
टाइम्स ऑफ इंडियानं दिलेल्या वृत्तानुसार सबरी बॅडमिंटन खेळत असताना अचानक हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होताा. त्याच्या मित्रानं तातडीनं रुग्णालयात दाखल केलं आणि कुटुंबियांना यासंदर्भात माहिती दिली. रुग्णालयात पोहोचताच हृदयविकाराच्या झटक्यामुळे मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
हे वाचा-"सुशांतच्या पैशांतून रिया चक्रवर्ती करायची पार्टी", फार्महाऊस मॅनेजरने केला मोठ
सबरी नाथने आपल्या करियरची सुरुवात मल्याळम सीरियल मिन्नूकेतुपासून केली. यात त्याने आदित्यची भूमिका निभावली होती. हा आदित्य घराघरात सगळ्यांचा लाडका झाला होता. सबरी नाथ यांनी अमाला, स्वामी अयप्पन आणि श्रीपादम यासारख्या मालिकांमध्ये काम केले आहे.
दोन दिवसांपूर्वी युवा अभिनेता प्रशांत लोखंडे याचं हृदयविकाराच्या धक्कानं निधन झालं होतं. स्वराज्यरक्षक संभाजी, स्वराज्यरजननी जिजामाता यासारख्या भूमिकांमध्ये त्यानं भूमिका साकारली होती. प्रशांतच्या जाण्यानं मनोरंजन विश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे. स्वराज्यरक्षक संभाजीमध्ये प्रशांतने अब्दुला दळवी ही भूमिका साकारली होती.